सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंधभक्तांची जमात फोफावत चाललीय, त्यांना कायद्याची भीती राहिली नाही का? बिहारमधील जमुई येथील प्रकाराबाबत रोहिणी खडसेंकडून संताप व्यक्त
  • मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; देशात पावसाची 15 टक्के तूट, महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज
 क्राईम

आयटी इंजिनिअरने पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले; स्वतःवरही वार करत गॅलरीतून उडी, देहूगावात खळबळ

डिजिटल पुणे    21-09-2026 13:50:44

पिंपरी : देहूगाव परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या धक्कादायक घटनेने रविवारी सकाळी परिसर हादरला. एका आयटी इंजिनिअरने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा जीव घेतल्यानंतर स्वतःवरही वार केले. त्यानंतर त्याने घराच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना देहूगावातील ओमकार सोसायटीत रविवारी (ता. २०) सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

या घटनेत शुभांगी आकाश बारस्कर (वय २८) यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती आकाश रामदास बारस्कर (वय २६) गंभीर जखमी झाले आहेत. आकाश यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

गस्तीवरील पोलिसांमुळे घटना उघडकीस

देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना ओमकार सोसायटी परिसरात एका व्यक्तीवर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आकाश हे रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेले आढळून आले.

यानंतर पोलिसांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या घराची पाहणी केली असता शुभांगी या गंभीर जखमी अवस्थेत आढळल्या. पोलिसांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शुभांगी यांना तपासून मृत घोषित केले.

लग्नानंतरपासूनच सुरू होते वाद

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आकाश हे हिंजवडीतील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शुभांगी यादेखील खासगी कंपनीत नोकरी करत होत्या. दोघांचा विवाह डिसेंबर २०२३ मध्ये झाला होता.विवाहानंतर दोघांमध्ये कौटुंबिक कारणांवरून वारंवार वाद होत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून हे दाम्पत्य देहूगावातील ओमकार सोसायटीत भाड्याने राहत होते.

रविवारी सकाळी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून आकाश यांनी पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पत्नीवर हल्ला केल्यानंतर त्यांनी स्वतःवरही वार केले आणि त्यानंतर गॅलरीतून खाली उडी मारल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

शुभांगी यांच्या मृतदेहाचे वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गंभीर जखमी आकाश यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण काय, दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि हल्ल्यापूर्वी काय घडले, याचा देहूरोड पोलिसांकडून तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती