पुणे : देशभरात यंदाच्या मोसमी पावसाची स्थिती चिंताजनक असतानाच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आता परतीचा प्रवास सुरू केला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 21 सप्टेंबरपासून राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांतून मान्सून माघारी फिरल्याची माहिती दिली आहे. देशात यंदा सरासरीच्या तुलनेत सुमारे 15 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, मान्सून परतीच्या मार्गावर असला तरी महाराष्ट्रात पुढील तीन दिवस काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे.
या भागांतून मान्सूनची माघार
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानच्या बहुतांश भागांतून मान्सून माघारी फिरण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत सौराष्ट्र-कच्छ, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागांतूनही मान्सून माघारी जाण्याची शक्यता आहे.यंदाच्या पावसाळ्यात देशातील अनेक भागांत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होत असतानाच पावसाच्या तुटीचा प्रश्नही कायम आहे.
महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता
मान्सून माघारी फिरत असला तरी महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. 21 आणि 22 सप्टेंबर रोजी राज्यातील विविध जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
21 सप्टेंबर : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, हिंगोली, परभणी, नांदेड, नाशिकचा घाट परिसर, अहिल्यानगर, पुण्याचा घाट परिसर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव आणि लातूर येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे.ठाणे, रायगड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
22 सप्टेंबर : राज्यात पावसाचा जोर काही भागांत वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसह नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा घाट परिसर तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे.दरम्यान, नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागांत ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाच्या सरींची शक्यता आहे.
23 सप्टेंबर : राज्यातील पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज आहे. दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस सुरू राहू शकतो. तर राज्याच्या उर्वरित भागांत हवामान प्रामुख्याने कोरडे किंवा ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या परतीला सुरुवात, मात्र महाराष्ट्रात पावसाची हजेरी
देशात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी महाराष्ट्रातील काही भागांत अद्याप पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.