पुणे : कर्णकर्कश्य स्पीकर व ढोल ताशांच्या आवाजाबद्दलच्या ११२ फोन नंबर वरील तक्रारीचे निवारण न करताच त्या बंद केल्या जात असल्याचे अनुभवास येत आहे. तसेच अनेकदा हा फोनच उचलला जात नाही, तर कधी फोन उचलला जावून लगेच बंद होत होता असाही अनुभव काल रात्री अनेकांना आला.
याबाबत पुणे पोलिस आयुक्तांशी यापूर्वीच बोलणे झाले होते. त्याप्रमाणे यावर पर्याय म्हणून संबंधित विभागवार पोलीस अधिकाऱ्यांचे नाव व फोन नंबर वेबसाईटवर जाहीर केले जातील असे आश्वासन अमितेश कुमार यांनी दिले होते, परंतु अजूनही अशी यादी वेबसाईटवर आलेली नाही.

सायलेंट झोन अंमलबजावणी बाबतही कोणतेही स्पष्टीकरण पोलीस आयुक्तांकडून आलेले नाही व त्याबाबत विभागवार सूचना फलक लावण्याची कार्यवाही अजूनही झालेली नाही. ही गंभीर बाब असून राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाचे अंमलबजावणी तातडीने होणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र प्रदूषण मंडळ तर याबाबत पूर्णपणे बेजबाबदारपणे वागत असून त्यांनी पुण्यातील विविध ठिकाणच्या रोजचा ध्वनी पातळी मोजणीचा डेटा हा देणे अपेक्षित असताना सुद्धा ही आकडेवारी अजून समोर आलेली नाही. उत्सव संपल्यानंतर या आकडेवारीचा फारसा उपयोग सामान्य जनतेस नाही.

लाऊडस्पीकर विरोधी पुणेकर मंचातर्फे यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांवरच न्यायालयाने आता स्वतः दखल घेत कारवाई करायला हवी अशी जाहीर मागणी केली आहे.
काल दिनांक 20 सप्टेंबर रोजी रात्री लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचातर्फे 24 तक्रारींच्या ईमेल थेट आयुक्तांना पाठवण्यात आलेल्या असून या आधीच्या व कालच्या तक्रारींची दखल अजूनही घेतली गेली नसल्याचे व साधी पोहोचली मिळाली नाही.याबाबत तक्रार क्लोज केल्याचे स्क्रीनशॉट, मेसेज, ईमेल स्क्रीनशॉट, तक्रार ठिकाणांचा गुगल मॅप आदी बाबी सोबत जोडल्या आहेत.

मुकुंद किर्दत, समन्वयक
लाऊडस्पीकर विरोधी पुणेकर मंच
PUNEKARS against LOUDspeakers