सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 शहर

गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; प्रशासनाच्या नियोजनावर सवाल, नागरिकांनाही स्वयंशिस्तीचे आवाहन

डिजिटल पुणे    22-09-2026 11:21:02

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या मध्यवर्ती पेठांमध्ये वाढणारी गर्दी आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. काही ठिकाणी गर्दीचा ताण इतका वाढत आहे की, चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ असा सवाल नागरिकांकडून प्रशासनाला केला जात आहे.

मध्यवर्ती भागातील गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातच अचानक रस्ते बंद करणे, अरुंद प्रवेशमार्ग, बंदिस्त देखाव्यांसमोरील लांबच लांब रांगा आणि पादत्राणे ठेवण्याच्या ठिकाणी होणारी झुंबड यामुळे परिस्थिती अधिक बिकट होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रशासनासोबत नागरिकांचीही जबाबदारी

गर्दीच्या परिस्थितीसाठी केवळ पोलिस आणि प्रशासनाला जबाबदार धरता येणार नाही, असे काही नागरिकांचे मत आहे. तरुणाईचा सेल्फीचा मोह, गर्दीत थांबून राहण्याची प्रवृत्ती आणि वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळेही कोंडीत भर पडत असल्याचे नागरिक सांगतात.

कौस्तुभ गद्रे यांच्या मते, पुण्यातील गणेशोत्सवातील भव्य आणि बंदिस्त देखाव्यांची संख्या वाढली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना टप्प्याटप्प्याने प्रवेश दिला जात असल्याने मंडपाबाहेर मोठी गर्दी जमा होते. प्रवेशमार्ग अरुंद असल्यास गर्दीचा ताण आणखी वाढतो.

‘केवळ प्रशासनाला दोष देणे योग्य नाही’

सदाशिव पेठेतील सिद्धार्थ बेंद्रे यांनी सांगितले की, गणेशोत्सवातील गर्दी निश्चितच चिंताजनक आहे; मात्र संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर टाकणे योग्य ठरणार नाही. पुण्यात बाहेरगावांमधूनही मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनासमोर गर्दी नियंत्रणाचे मोठे आव्हान निर्माण होते.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्दीत अडचण होऊ शकणाऱ्या व्यक्तींनी शक्यतो अतिगर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनही नागरिकांकडून करण्यात येत आहे. गणेश मंडळे, पोलिस, महापालिका, प्रशासन आणि नागरिक यांच्यात योग्य समन्वय राहण्यासोबतच नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवतानाच गर्दीचे योग्य नियोजन, सुरक्षित प्रवेश-निर्गमन मार्ग आणि प्रभावी वाहतूक नियंत्रण याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी पुणेकरांकडून होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती