गौराई माझ्या सुनेगावची; ६१ वर्षांच्या त्याग, माया आणि संस्कारांची अखंड गाथा! गरिबीच्या चुलीपासून घरच्या वैभवापर्यंत; पार्वती स्वामींच्या जीवनतपश्चर्येला सलाम!
गौराई माझ्या सुनेगावची : साक्षात अन्नपूर्णा आणि त्यागाची मूर्ती
मातृछत्र हरपलेली राष्ट्रसंतांची मानसकन्या ते सुनेगावच्या संयुक्त कुटुंबाचा आधारवड... सौ. पार्वती शंकरराव स्वामी यांच्या ६१ वर्षांच्या अखंड जीवनतपश्चर्येची गाथा!
अंगणात मातीचं सुबक सडा-सारवण, दारात आपुलकी, स्नेह अन् मायेची उमटलेली रांगोळी... गेरूने रंगवलेला तो भक्कम उंबरा ओलांडून आत येणारा प्रत्येक जीव तृप्त होऊनच परतायचा.
सुनेगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर : सुनेगावच्या मातीत ६१ वर्षांपूर्वी जेव्हा तिचं पाऊल पडलं, तेव्हा केवळ एका संसाराची नव्हे, तर एका अलौकिक जीवनतपश्चर्येची सुरुवात झाली होती. ती माऊली म्हणजे माझी आई—सौ. पार्वती शंकरराव स्वामी. आईचं माहेर अहमदपूरचं. बालपणातच तिच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरपलं; आजीनेच तिचं बोट धरून तिला लहानाचं मोठं केलं. आजोबांचं घर राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या मठाशेजारीच. त्यामुळे बालपणापासूनच मठातील भक्ती, सेवा आणि त्यागाचे संस्कार तिच्या रक्तामांसात भिनले. राष्ट्रसंतांचा वरदहस्त तिच्या पाठीशी होता; त्यांनी तिला साक्षात आपली ‘मानसकन्या’ मानलं होतं. संतांच्या आशीर्वादाची हीच शिदोरी घेऊन साल १९६५ मध्ये ती सुनेगावच्या घरात सून म्हणून आली.
माझे आजोबा कैलासवासी गंगाधर महादया स्वामी व आजी कै भागेरथीबाई यांचा परिवार तसा मोठा; त्यांना तीन मुले आणि तीन मुली. आईचं लग्न झालं तेव्हा आमच्या वडिलांना धरून घरात तीन भाऊ, पैकी आमचे वडील नुकतेच मॅट्रिक चा परीक्षेला बसलेले , तर लहाने चुलते अवघ्या तिसरी-चौथीत शिकत होते. तीन बहिणींपैकी दोघींची लग्ने झालेली होती—एक खेरकरवाडी तर दुसरी मोठी लाठी (शिराढोनजवळ) तिसरी नणंद अद्याप लहान होती. अशा रीतीने दोन दिर , लहान नणंद आणि सासू-सासरे असा भलामोठा गोतावळा,येणार जाणारे,माणसांनी भरलेलं मोठं खटलं घरात होतं.
ते दिवस अत्यंत खडतर आणि परिस्थिती पार हाताबाहेरची होती. शेतात हवं तसं पिकत नव्हतं; ज्वारीच्या कणग्या रिकाम्या असल्याने कधी कण्या खाऊनही दिवस काढावे लागत. घरात माणसं जास्त आणि साधनं तोकडी. साधा चहा करायचा तरी साखर-पत्तीची भ्रांत; अशा वेळी घरातले दाणे विकून कसातरी गुळाचा चहा व्हायचा. पावसाळ्यात गळणाऱ्या छपराखाली स्वयंपाकाला बसल्यावर आभाळातून अखंड पाणी गळायचं; त्या पावसात फक्त चुलीपुरती जागा कशीबशी कोरडी राहायची. अशा अथांग गरिबीच्या अंधारात राष्ट्रसंतांच्या या मानसकन्येने आशेचा दिवा अखंड तेवत ठेवला.
‘महाराजांचं घर’ म्हणून गावात जी एक नीतिमत्तेची आणि आदराची ओळख होती, ती तिने आपल्या पदराखाली घट्ट जपून ठेवली. अंगावर दोन ठिकाणी जोडलेलं फाटकं लुगडं नेसून, नदीवरून पाण्याचे हंडे वाहण्यापासून ते उकिरडा-गोठ्यातलं शेण काढण्यापर्यंत तिने स्वतःला संसारात झोकून दिलं. ‘पारबती’ अशी सासऱ्यांची हाक कानावर पडताच पदर खोचून हजर राहणारी ही साधी सून कधी घराचा भक्कम आधारवड झाली, हे तिचं तिलाही कळलं नाही.
तिने केवळ गरिबीचे दिवस काढले नाहीत, तर संसाराला संपन्नतेचं वैभव मिळवून दिलं. गोठ्यातल्या एका गायीचे दोन आणि नंतर चार बैल झाले, दुभत्या म्हशी आल्या. शेतातून दमून-भागून आलेल्या गुराढोरांना पाणी पाजण्यापासून ते चुलीच्या संथ जाळावर अख्ख्या घरादाराचं आणि गड्या-माणसांचं जेवण रांधण्यापर्यंत तिचे हात कधी थकले नाहीत. डाळी-साळीचा भात घरीच सडून तयार करणं असो वा परगावी शिकायला असलेल्या दीरांसाठी मायेने शिदोऱ्या बांधणं असो; तिने स्वतःच्या वयाचा विचार न करता घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचं कोडकौतुक केलं. कितीतरी बाळंतपणं तिने कौशल्याने आणि मायेने निभावली. स्वतःच्या पोरांप्रमाणे भाच्यांना घडवलं आणि जीवापाड नाती जपली.
"महाराजांच्या घरी जा, तिथून कोणी उपाशी परत जात नाही." अशी काही जण म्हणायची..
परिस्थितीची झळ सोसूनही तिने कधी कुणाला विन्मुख पाठवलं नाही. हाताला शिवणकामाची जोड देऊन तिने संसाराच्या फाटक्या पटलाला मायेची ठिगळं लावली. तिचं हे औदार्य केवळ घराच्या चार भिंतींपुरतं मर्यादित नव्हतं; अख्खं गावच तिचा परिवार बनलं होतं. गावात कुणीही असो, वयाने मोठ्या असणाऱ्यांना कधी भावासारखा, तर कधी दिरासारखा मान देत कुणाला ‘अण्णासाब’, कुणाला ‘बाबू’, तर कुणाला प्रेमाने ‘भाऊ’ अशी साद घालून ती आदराने जिंकायची. वयाच्या ज्येष्ठ, समवयस्क म्हाताऱ्या बायांना तर ती काळजातून ‘माय’ म्हणून हाक मारायची. तिच्या या अकृत्रिम, निर्मळ वागण्याने ती संपूर्ण गावाला आपलीशी वाटू लागली; साऱ्या गावाची ती लाडकी ‘पारबती’ झाली.
एकेकाळी स्वतःच्या अंगावर फाटकं लुगडं असताना आणि महालक्ष्मींना नेसवायला साधी नवी साडी मिळणंही दुरापास्त असताना, तिने सणाचं पावित्र्य आणि घराची प्रतिष्ठा कधी ढळू दिली नाही. एकत्र कुटुंबातील दीर, जावा आणि सर्व परिवाराला सोबत घेऊन तिने तब्बल पन्नास वर्षे अखंडपणे एकत्र महालक्ष्मींची प्रतिष्ठापना केली. सुनेगावात गौरी-गणपतीचा सण म्हणजे अख्खं गाव उलटायचं. आळीव पेरून सजवलेले हिरवेगार देखावे, कारंजे आणि पंधरा दिवसांची ती लगबग... नोकरीनिमित्त बाहेर गेलेले नांदेडचे दीर, जाऊ, देगलूरहून आलेले आप्तेष्ट अन् भावंडांचा गोतावळा एकत्र यायचा, तेव्हा घराला खऱ्या अर्थाने गोकुळाचं रूप यायचं. घराचा हा डोलारा सांभाळताना दोघी काकूंनीही आईचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. कोणत्याही मोठ्या पदवीविना तिने जगण्याचा जो वस्तुपाठ घालून दिला, तो जगातील कोणत्याही विद्यापीठात शिकता येत नाही.
काळ पुढे सरकला तशी नात्यांची समीकरणं बदलली, माणसं बदलली; तरीही या माऊलीच्या चेहऱ्यावरची शांतता आणि तृप्ती कधी ढळली नाही. जिने आयुष्यभर स्वाभिमानाची शिकवण दिली, ती आजही कुणापुढे हात पसरत नाही. वयाची शहात्तरी गाठताना, नात्यातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला वाकून नमस्कार करताना तिच्यात जो निगर्वी भाव दिसतो, तो राष्ट्रसंतांच्या संस्कारांची साक्ष देतो. "मी केलं" हा अहंकार तिच्या स्पर्शालाही कधी शिवला नाही.
गावातील नरहरी तात्या आजही कृतज्ञतेने सांगतात, "आम्ही वहिनीच्या हातचं खूप जेवलो." हणमंतराव पोशट, माणिकराव सोनवळे यांच्यासारखी कितीतरी ज्येष्ठ मंडळी त्यावेळचे खडतर दिवस आणि आईच्या मायेची महती सांगताना आजही गहिवरतात. गावातील प्रत्येक समवयस्क माऊली तिचे कष्ट, तिचा त्याग आणि तिने सोसलेले दिवस आठवून डोळ्यांत पाणी आणते. आजच्या माणसांसारखा संकुचित, स्वार्थी विचार तिने केला असता, तर पुढच्या पिढ्या कशा घडल्या असत्या? तिने गावच्या आयाबायांना भरभरून प्रेम दिलं आणि संयुक्त कुटुंबातील संस्कृतीची वीण अखंड घट्ट ठेवली.
आज बासुंदीचा गोड नैवेद्य दाखवून जेव्हा आम्ही त्या माऊलीच्या चरणी माथा टेकवतो, तेव्हा एक मुलगा म्हणून माझं अंतःकरण तिच्या त्यागाने, कष्टाने आणि तिने उभ्या केलेल्या या संसाराने पूर्णतः कृतकृत्य होतं. आज आम्ही जे काही आहोत, आमचं घर ज्या वैभवात ताठ मानेने उभं आहे, ती निव्वळ त्या महालक्ष्मीची आणि आमच्या घरात आलेल्या या चालत्या-बोलत्या 'पार्वती' नावाच्या साक्षात लक्ष्मीचीच असीम कृपा आहे.
आपण आजन्म तिच्या ऋणात राहून एक कुटुंब म्हणून नक्कीच आत्मपरीक्षण करायला हवे. तिच्या पावलांवर पाऊल ठेवून संकटात धीर धरणं, गाव-परिवाराला एकत्र बांधून ठेवणं आणि निःस्वार्थ प्रेमाचा वारसा पुढे चालवणं हाच तिच्या जीवनतपश्चर्येचा खरा बोध आहे.
अशा या त्यागमूर्ती, राष्ट्रसंतांची मानसकन्या आणि साक्षात अन्नपूर्णा स्वरूप माझ्या आईच्या चरणी माझे कोटी-कोटी त्रिवार वंदन!
डॉ. संतोषकुमार स्वामी, सुनेगांवकर
आरोग्यसंपदा होमिओपॅथीक मल्टी स्पेशालिटी क्लिनिक, नांदेड
भ्रमणध्वनी : ८१४९३४१५४१