सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 जिल्हा

मुंबईत धक्कादायक घटना! CSMTमध्ये रेल्वे पोलिसांच्या ताब्यात तरुणाचा मृत्यू; शौचालयात गेल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत आढळला, CIDकडे तपास

डिजिटल पुणे    22-09-2026 15:11:39

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील खंडवा येथील इमरान शेख हा रोजगाराच्या शोधात मुंबईत आला होता. 20 सप्टेंबर रोजी तो CSMT येथील RPF पोस्टवर गेला असता त्याच्यासोबत ही घटना घडली. या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र CIDकडे सोपवण्यात आला आहे.

खंडव्याला जाणाऱ्या रेल्वेची माहिती घेण्यासाठी आला होता

मध्य रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 10.18 वाजता इमरान CSMT मुख्य RPF पोस्टवर खंडव्याला जाणाऱ्या रेल्वेबाबत माहिती घेण्यासाठी पोहोचला. त्यावेळी तो अस्वस्थ अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले.

काही व्यक्ती आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा तो करत होता, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यानंतर त्याची वर्तणूक आक्रमक झाल्याचे RPFकडून सांगण्यात आले. RPFच्या म्हणण्यानुसार, त्याने SI अनिकेत यांच्यावर हल्ला केला आणि स्वतःलाही इजा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला आवरण्यात आले.

शौचालयात गेल्यानंतर अचानक बेशुद्ध

दुपारी सुमारे 12.30 वाजता इमरानला शौचालयात जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र सात ते आठ मिनिटे उलटूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शौचालयाचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी इमरान आतमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.

घटनेनंतर त्याला तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुपारी सुमारे 12.54 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद CSMT GRPकडून अनैसर्गिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.दरम्यान, इमरानच्या नातेवाईकांनी त्याच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले असून, त्याला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपांची चौकशी तपास यंत्रणेकडून केली जात आहे.

ओळखपत्र आणि मोबाईल नाही; दोन रेल्वे तिकिटे सापडली

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, इमरानकडे कोणतेही ओळखपत्र किंवा मोबाईल फोन आढळला नाही. मात्र, त्याच्याकडे दोन जनरल रेल्वे तिकिटे सापडली.यातील एक तिकीट 18 सप्टेंबर 2026 रोजीचे खंडवा-भुसावळ मार्गाचे, तर दुसरे 19 सप्टेंबर 2026 रोजीचे नाशिक-दादर मार्गाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याची ओळख निश्चित करण्यासाठी त्याचा फोटो भुसावळ विभाग आणि स्थानिक पोलिसांकडे पाठवण्यात आला आहे.इमरान मुंबईत कोणत्या कारणासाठी आला होता, तसेच मुंबईत असताना त्याच्या नेमक्या हालचाली काय होत्या, याचाही तपास सुरू आहे.

मृत्यूचे नेमके कारण काय? CIDकडून तपास

RPFच्या ताब्यात असताना इमरानचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र पोलिसांच्या CIDकडे सोपवण्यात आली आहे. CID कोकण रेंजचे SP प्रशांत वाघुंडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असल्याची माहिती आहे.इमरानच्या मृतदेहाचे जेजे रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले आहे. आता पोस्टमार्टम अहवाल आणि घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासल्यानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण आणि त्या वेळची परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.दरम्यान, रेल्वे प्रशासनाची भूमिका, नातेवाईकांनी केलेले आरोप आणि तपासातून समोर येणारे पुरावे यावर या प्रकरणाचा पुढील तपास अवलंबून आहे.


 Give Feedback



 जाहिराती