सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 जिल्हा

मुंबईत नशेत तरुणीचा रस्त्यावर गोंधळ; शांत करण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसाला चावा, वांद्र्यातरात्रीच्या सुमारास नेमकं काय घडलं?

डिजिटल पुणे    23-09-2026 12:28:03

मुंबई : वांद्रे पश्चिम परिसरातील प्रसिद्ध माऊंट मेरी जत्रेदरम्यान नशेच्या अवस्थेत एका तरुणीने रस्त्यावर गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या या तरुणीला शांत करण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी तिने वाद घातला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तरुणीने महिला पोलीस शिपाईच्या हाताला चावा घेतला. या घटनेत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या असून, वांद्रे पोलिसांनी संबंधित २८ वर्षीय तरुणीला अटक केली आहे.

चॅपल रोडवर रात्रीच्या सुमारास गोंधळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९.१० वाजण्याच्या सुमारास चॅपल रोडवरील कार्मेल चर्चसमोर एक महिला मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत असल्याची माहिती वांद्रे पोलिसांना मिळाली. माऊंट मेरी जत्रेमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी असताना हा प्रकार घडल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.वांद्रे पोलीस ठाण्याच्या मोबाईल व्हॅनवर कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस शिपाई यशोदा चौगुले (३७) आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी सांताक्रूज येथील कलिना कोळीवाडा परिसरात राहणारी निकी क्रिस जसिंग्टो (२८) ही तरुणी नशेच्या अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

समजावून सांगण्याचा प्रयत्न, मात्र वाद वाढला

परिस्थिती लक्षात घेऊन महिला पोलिसांनी तरुणीला शांत राहण्यास सांगितले. तसेच तेथून निघून जाण्याची विनंती केली. मात्र, तरुणीने पोलिसांचे म्हणणे ऐकण्यास नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तिने पोलिसांशी वाद घालत शिवीगाळ आणि अरेरावी करण्यास सुरुवात केली.परिस्थिती अधिक चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. तिला पोलीस वाहनात बसण्यास सांगण्यात आले. मात्र, तिने पोलीस वाहनात जाण्यास नकार दिला आणि पोलिसांच्या कारवाईला विरोध केला.

ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच महिला पोलिसावर हल्ला

यानंतर पोलीस शिपाई यशोदा चौगुले आणि महिला पोलीस हवालदार पाडवी यांनी तरुणीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निकीने चौगुले यांना पाठीमागून पकडले आणि त्यांच्या डाव्या हाताच्या दंडाला जोरात चावा घेतल्याचा आरोप आहे.अचानक झालेल्या या हल्ल्यात चौगुले यांच्या हाताला दुखापत झाली आणि रक्तस्राव सुरू झाला. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत तरुणीला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला वांद्रे पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

दोघींची वैद्यकीय तपासणी

घटनेनंतर जखमी महिला पोलीस कर्मचारी यशोदा चौगुले यांच्यावर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच आरोपी तरुणीचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, घटना घडली त्यावेळी तरुणी नशेच्या प्रभावाखाली असल्याचे समोर आले.दरम्यान, माऊंट मेरी जत्रेमुळे परिसरात मोठी गर्दी असताना सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे गोंधळ झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा

महिला पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणे, ऑन-ड्यूटी पोलिसावर हल्ला करून दुखापत करणे, पोलिसांना शिवीगाळ करणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी निकी क्रिस जसिंग्टोविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी तरुणीला अटक केली असून, घटनेमागील संपूर्ण परिस्थितीचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जात असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती