मुंबई : कुलाब्यात पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. नानाभाई मुसा मार्गावरील गंगोत्री इमारतीजवळ हा अपघात घडला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती इमारतीच्या संरक्षण भिंतीवर जोरदार आदळल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमित सतवान वाल्मिकी (२२) आणि त्याचा धाकटा भाऊ संजू सतवान वाल्मिकी (१५) हे दोघे दुचाकीवरून प्रवास करत होते. पहाटे सुमारे ४.४५ ते ५ वाजण्याच्या दरम्यान दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीवर आदळली. धडकेत दोघांच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली.अपघाताची माहिती मिळताच कुलाबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने जी. टी. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.
सुमित आणि संजू हे कफ परेड परिसरातील गणेशमूर्ती नगर येथील रहिवासी होते. त्यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील बदायू असल्याची माहिती आहे. दोघे MH 01 FK 3556 क्रमांकाच्या टीव्हीएस दुचाकीवरून प्रवास करत होते.
दरम्यान, कुलाबा पोलिसांनी या घटनेची अपमृत्यू म्हणून नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जी. टी. रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी करून आवश्यक नमुने घेतले आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा पोलीस तपास करत आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत अपघातांच्या घटनांमुळे चिंता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी पोस्टल रोड पुलावरून बीएमडब्ल्यू कार सुमारे ७० फूट खाली कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता कुलाब्यात झालेल्या दुचाकी अपघातात दोन सख्ख्या भावांचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.