लातूर : दुष्काळाच्या संकटाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला धीर देत जवळ घेतले. “साहेब, माझं खूप नुकसान झालंय, आता माझ्याजवळ काहीच उरलं नाही. काहीतरी करा,” अशी आर्त विनवणी करताच शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याला मिठीत घेत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी लातूर जिल्ह्यातील जाऊ गावाला भेट देत प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक आणि पाणी परिस्थितीची पाहणी केली.
जाऊ गावात शेतकऱ्यांनी कमी पाऊस आणि पिकांच्या नुकसानीची व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. पाऊस वेळेवर न झाल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ आली. मात्र, त्यानंतरही अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिके उगवलीच नाहीत. काही भागात उगवलेली पिकेही पावसामुळे खराब झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
याचदरम्यान एका शेतकऱ्याने आपल्या नुकसानीची माहिती देताना भावनिक होत मुख्यमंत्र्यांसमोरच रडायला सुरुवात केली. शेतकऱ्याची व्यथा ऐकून फडणवीस यांनी त्याला जवळ घेतले आणि “काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” असा धीर दिला.
दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच
लातूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत शासन गंभीर असल्याचे स्पष्ट केले. दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळासंदर्भातील अहवाल शासनाला प्राप्त झाले असून, आवश्यक त्या उपाययोजनांवर कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पाणी आणि चाऱ्याचे नियोजन
दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याचे काम शासनाकडून सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लवकरच भरीव मदत देण्याची ग्वाही
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना या संकटात वाऱ्यावर सोडले जाणार नाही आणि लवकरच भरीव व ठोस मदत जाहीर केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.