सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पक्ष फोडणाऱ्या, चोरणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारांसह त्यांच्या म्होरक्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे; SIR प्रक्रिया रद्द करा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
  • ना पाऊस, ना पाणी! दुष्काळी परिस्थितीमुळं लग्न जमेना, तरुण शेतकऱ्यानं मुख्यमंत्री फडणवीसांसमोर मांडली व्यथा
  • ‘तुम्हाला भेटल्यानंतर आत्महत्येचा विचार दूर झाला’; एकनाथ शिंदेंना पाहून शेतकऱ्याला रडू कोसळले, उपमुख्यमंत्र्यांनी धीर दिला
 विश्लेषण

गणेश विसर्जनासाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; १७ प्रमुख रस्ते बंद, २७ ठिकाणी पार्किंगची सुविधा

डिजिटल पुणे    23-09-2026 18:22:56

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी आणि भाविकांची सुरक्षितता राखता यावी, यासाठी शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळपासून मिरवणूक संपेपर्यंत शहरातील १७ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच मुख्य विसर्जन मार्गावर २४ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून नो-पार्किंग लागू करण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मात्र आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.

हे १७ प्रमुख रस्ते राहणार बंद

छत्रपती शिवाजी रस्ता – काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक

लक्ष्मी रस्ता – संत कबीर चौकी ते अलका टॉकीज चौक

बाजीराव रस्ता – सावरकर चौक ते फुटका बुरूज चौक

कुमठेकर रस्ता – टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक

गणेश रस्ता – दारूवाला पूल ते जिजामाता चौक

केळकर रस्ता – बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक

टिळक रस्ता – जेधे चौक ते टिळक चौक

शास्त्री रस्ता – सेनादत्त चौकी ते अलका टॉकीज चौक

जंगली महाराज रस्ता – झाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौक

कर्वे रस्ता – नळ स्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक

फर्ग्युसन रस्ता – खंडोजीबाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट

भांडारकर रस्ता – पी.वाय.सी. जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौक

पुणे-सातारा रस्ता – व्होल्गा चौक ते जेधे चौक

सोलापूर रस्ता – सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक

प्रभात रस्ता – डेक्कन पोस्टे ते शेलारमामा चौक

बगाडे रस्ता – सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक

गुरुनानक रस्ता – देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक

या चौकांवरून वाहतूक वळवणार

विसर्जन मिरवणुकीच्या हालचालींनुसार विविध ठिकाणी वाहतूक वळवण्यात येणार आहे. झाशी राणी चौक, काकासाहेब गाडगीळ पुतळा, अपोलो टॉकीज/दारूवाला पूल, संत कबीर पोलिस चौकी, सेव्हन लव्हज चौक, व्होल्गा चौक, सावरकर पुतळा चौक, सेनादत्त पोलिस चौकी, नळ स्टॉप आणि गुडलक चौक या प्रमुख ठिकाणी वाहतूक वळवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहनचालकांनी कर्वे रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, सिमला ऑफिस चौक, संचेती हॉस्पिटल चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक, आंबेडकर रस्ता, नेहरू रस्ता, सेव्हन लव्हज चौक, वखार महामंडळ चौक, शिवनेरी रस्ता, गुलटेकडी-मार्केटयार्ड, सातारा रस्ता आणि सिंहगड रस्ता आदी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

२४ सप्टेंबरच्या रात्रीपासून नो-पार्किंग

२४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून मुख्य विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मिरवणुकीच्या मार्गावर सर्वसामान्य वाहनांना पार्किंग करता येणार नाही. लक्ष्मी, केळकर, कुमठेकर, टिळक, बाजीराव, शिवाजी, शास्त्री, जंगली महाराज, कर्वे आणि फर्ग्युसन रस्त्यावर नो-पार्किंग लागू राहणार आहे. खंडोजीबाबा चौक ते हॉटेल वैशालीदरम्यानच्या उपरस्त्यांच्या सुमारे १०० मीटर परिसरातही पार्किंगला बंदी असेल.

जड वाहनांना ४८ तास प्रवेशबंदी

विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शनिवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पुणे शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. त्यामुळे जड वाहनचालकांनी या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा.

धायरी, नांदेड, केशवनगर, मुंढवा, ससाणेनगरमध्येही बदल

विसर्जनाच्या दिवशी धायरी फाटा, नांदेड, केशवनगर, मुंढवा, ससाणेनगर आणि हडपसर परिसरातही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. धायरी फाटा येथून उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. सिंहगड रस्त्यावर सकाळी ११ ते रात्री १२ या कालावधीत वाहतुकीवर निर्बंध राहतील.

केशवनगर आणि मुंढवा परिसरातही मिरवणुकीच्या परिस्थितीनुसार वाहतूक वळवली जाणार आहे. वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा.

विसर्जनाच्या दिवशी २७ ठिकाणी पार्किंगची सुविधा

भाविकांची गैरसोय होऊ नये आणि मुख्य रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी शहरात २७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी दुचाकी पार्किंगची सुविधा असून, काही ठिकाणी चारचाकी वाहनांसाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रमुख पार्किंग ठिकाणे : न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, निलायम टॉकीज, शिवाजी आखाडा वाहनतळ, देसाई कॉलेज, विमलाबाई गरवारे हायस्कूल, हमालवाडा, आबासाहेब गरवारे कॉलेज, संजीवनी मेडिकल कॉलेज मैदान, गोगटे प्रशाला, आपटे प्रशाला, फर्ग्युसन कॉलेज, एसएसपीएमएस शिवाजीनगर, जैन हॉस्टेल, एसपी कॉलेज, मराठवाडा कॉलेज, पीएमपीएमएल मैदान, पेशवा पथ, रानडे पथ, पेशवे पार्क-सारसबाग, हरजीवन रुग्णालयासमोरील जागा, काँग्रेस भवन रस्ता, पाटील प्लाझा पार्किंग, पर्वती-दांडेकर पूल परिसर, दांडेकर पूल-गणेशमळा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता, नदीपात्र भिडे पूल-गाडीतळ पूल आणि बीएमसीसी मैदान आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

गणेश विसर्जनासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक बदल करण्यात आल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना वाहतूक नियोजन लक्षात घ्यावे आणि शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती