सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 शहर

यंदा गणेशोत्सवात राजकीय नेत्यांची उपस्थिती घटली; मंडळांच्या निमंत्रणांना अपेक्षित प्रतिसाद नाही, कार्यकर्त्यांच्या निमंत्रणांकडे दुर्लक्ष?

डिजिटल पुणे    24-09-2026 10:17:22

पुणे : गेल्या दोन-तीन वर्षांपासून लोकसभा, विधानसभा आणि पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेशोत्सवाला राजकीय रंगही चढला होता. गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील विविध पक्षांचे नेते मानाच्या गणपतींसह शहरातील प्रमुख गणेश मंडळांना भेटी देत होते. कार्यकर्त्यांशी संवाद, आरती आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटींचे सत्र सुरू असायचे. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात या राजकीय भेटींचा उत्साह तुलनेने कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंडळ भेटी यंदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. काही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांशी संपर्क साधून निमंत्रणे दिली; मात्र त्यानंतरही अपेक्षित भेटी झाल्या नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ‘निवडणुका नसल्याने यंदा नेत्यांचे मंडळांकडे दुर्लक्ष झाले का?’ अशी चर्चा गणेश मंडळांच्या वर्तुळात सुरू झाली आहे.

प्रमुख नेत्यांच्या काही मंडळांना भेटी

यंदाच्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, साने गुरुजी तरुण मंडळ आणि साई मित्र मंडळाला भेट दिली. याशिवाय राज्य मंत्रिमंडळातील चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, शंभूराज देसाई, भरत गोगावले तसेच केंद्रीय मंत्री राम मोहन रेड्डी, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही पुण्यातील विविध मंडळांना भेटी दिल्या.

मात्र, मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा नेत्यांच्या मंडळ भेटींची संख्या कमी असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. विशेषतः निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने विविध मंडळांमध्ये नेत्यांची गर्दी दिसत होती, तसा माहोल यंदा जाणवला नाही.

अजित पवारांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या देखाव्यांकडेही नेत्यांची पाठ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे देखावे उभारले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या मंडळांना भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधावा, अशी अपेक्षा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली होती.

विशेषतः सुनेत्रा पवार तसेच पार्थ पवार आणि जय पवार यांच्या उपस्थितीचीही काही मंडळांना अपेक्षा होती. मात्र, त्यांची पुण्यातील गणेशोत्सवातील उपस्थिती दिसून आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही याबाबत चर्चा सुरू झाली.

एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीचीही चर्चा

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील अनेक मंडळांना भेटी देत होते. डझनभर मंडळांमध्ये जाऊन आरती आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा त्यांचा कार्यक्रम असायचा. मात्र, यंदा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या मंडळ भेटी तुलनेने कमी राहिल्याचे दिसून आले.

मोहोळांकडून निवडक मंडळांनाच भेटी

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात होते. त्यांना विविध गणेश मंडळांच्या आरतीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यासाठी भाजपच्या अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी संपर्क साधला होता. मात्र, त्यांनी काही निवडक मंडळांनाच भेटी दिल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक आणि राजकीय संपर्काचेही महत्त्वाचे माध्यम बनला आहे. त्यामुळे दरवर्षी नेत्यांच्या मंडळ भेटींना विशेष महत्त्व दिले जाते. यंदा मात्र काही प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे मंडळांना दिल्या जाणाऱ्या राजकीय भेटींच्या बदललेल्या समीकरणांची चर्चा पुण्याच्या राजकीय आणि गणेशोत्सवाच्या वर्तुळात रंगली आहे.


 Give Feedback



 जाहिराती