पुणे: विवेकानंद केंद्राच्या पुणे शाखेतर्फे या वर्षी विश्वबंधुत्वदिनानिमित्त ‘युथ आयकॉन – स्वामी विवेकानंद’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार,दि.२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत दांडेकर पूल येथील रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. ज्ञान प्रबोधिनी, पुणे चे कार्यवाह प्रा. महेंद्र सेठिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दीपक पौडेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
११ सप्टेंबर १८९३ ला स्वामी विवेकानंदांनी शिकागो सर्वधर्मपरिषदेत केलेले भाषण जगप्रसिद्ध आहे. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे (वसुधैव कुटुम्बकम्) हा संदेश त्यांनी दिला. जात, धर्म किंवा देशाच्या पलीकडे जाऊन एकमेकांकडे मानवतेच्या दृष्टीने पाहणे अत्यंत गरजेचे आहे असे ही त्यांनी सांगितले. या ऐतिहासिक दिनाचे स्मरण म्हणून विवेकानंद केंद्रातर्फे विश्वबंधुत्वदिन साजरा करण्यात येतो. या जाहीर व्याख्यानास सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, शाखा पुणे यांनी केले आहे.पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ हे पत्रकार, प्रभावी वक्ते आणि राजकीय विश्लेषक आहेत.राष्ट्रवाद,राष्ट्रीय सुरक्षा यांसारख्या संवेदनशील विषयांवरील त्यांच्या स्पष्ट आणि धारदार मतांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जातात.