सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 शहर

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे PMPMLच्या बसस्थानकांमध्ये बदल, पर्यायी ठिकाणे जाहीर

डिजिटल पुणे    24-09-2026 13:00:35

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. याचा परिणाम पीएमपीएमएलच्या बससेवेवरही होणार असून, शुक्रवारी (२५ सप्टेंबर) स्वारगेट आणि डेक्कन परिसरातील काही प्रमुख बसस्थानके तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी नेहमीच्या स्थानकांऐवजी पर्यायी ठिकाणांवरून बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आणि कर्वे रस्ता या प्रमुख मार्गांवर वाहतूक निर्बंध राहणार आहेत. त्यामुळे या मार्गांवरील बसच्या वाहतुकीतही परिस्थितीनुसार तात्पुरते बदल केले जाण्याची शक्यता आहे.

कोणत्या बस कुठून सुटणार?

लक्ष्मीनारायण चौक :

स्वारगेट येथील शाहू महाराज बसस्थानकाऐवजी सातारा रस्त्याने कात्रज, कोंढवा, अप्पर आणि मार्केट यार्डकडे जाणाऱ्या बस लक्ष्मीनारायण चौकातून सोडण्यात येतील.

पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ) :

नटराज बसस्थानकातून सुटणाऱ्या सिंहगड रस्त्याच्या दिशेने जाणाऱ्या बस पर्वती पायथा येथील स्वामी समर्थ मठाजवळून धावतील.

वेगा सेंटर, स्वारगेट डेपो परिसर :

सोलापूर रस्त्याने पुलगेट आणि हडपसरकडे जाणाऱ्या, तसेच भवानी पेठ, नाना पेठ आणि रास्ता पेठेकडे जाणाऱ्या बस स्वारगेट स्थानकाऐवजी वेगा सेंटरजवळून सोडण्यात येतील.

एस.एन.डी.टी. कॉलेजजवळ :

डेक्कन जिमखाना बसस्थानकाऐवजी कोथरूड डेपो, माळवाडी आणि एनडीए गेटच्या दिशेने जाणाऱ्या बस एस.एन.डी.टी. कॉलेजजवळून मार्गस्थ होतील.

प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?

विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या बदलांनुसार पीएमपीएमएलच्या बसमार्गांमध्येही तात्पुरते फेरबदल होऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी बसचे पर्यायी स्थानक आणि मार्ग याची माहिती घ्यावी.गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे होणाऱ्या वाहतूक बदलांना सहकार्य करावे आणि गर्दीच्या परिसरात प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती