सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 विश्लेषण

स्लीपर एसी बसला भीषण आग; 9 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, 20 जण बचावले; मृतदेहांची ओळख पटवणे कठीण

डिजिटल पुणे    24-09-2026 13:21:38

नोएडा : उत्तर प्रदेशातील नोएडा येथे यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर एसी बसला लागलेल्या भीषण आगीत नऊ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. आगीची तीव्रता इतकी होती की मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाल्याने त्यांची ओळख पटवणेही आव्हानात्मक ठरत आहे. बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. यातील काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत खिडक्या फोडून बाहेर उड्या मारल्या, तर बचाव पथकाने अन्य 20 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.

ही दुर्घटना बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास जेवर विमानतळापासून सुमारे 500 मीटर अंतरावर घडली. दिल्लीतील काश्मिरी गेट येथून ही बस महोबाच्या दिशेने रवाना झाली होती. प्राथमिक तपासानुसार, बसच्या एसी इंजिनमध्ये ठिणगी पडल्याने किंवा स्फोट झाल्याने आग लागल्याची शक्यता अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रदीप कुमार यांनी व्यक्त केली.

45 मिनिटांत आगीवर नियंत्रण; दोन तास बचावकार्य

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची पाच वाहने घटनास्थळी दाखल झाली. सुमारे 45 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांपर्यंत पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी स्लीपर बसचा मागील भाग कापला. त्यानंतर एक-एक करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. बचावकार्य जवळपास दोन तास सुरू होते.

बसविरोधात आधीच 19 चालान

आगीच्या दुर्घटनेनंतर बसच्या नियमभंगाची बाबही समोर आली आहे. ही बस मध्य प्रदेशातील राज कल्पना ट्रॅव्हल्सची असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या बसविरोधात यापूर्वीच 19 चालान जारी करण्यात आले होते. या प्रकरणांत प्रवासी आणि मालाची वाहतूक तसेच आवश्यक परवाना किंवा परवानगीशी संबंधित नियमभंगाचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांत मिळून सुमारे 1.75 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, हा दंड अद्याप भरलेला नसल्याची माहिती आहे. बसचे पहिले चालान 2024 मध्ये करण्यात आले होते.

बसची उंचीही नियमापेक्षा अधिक

गौतम बुद्ध नगर आरटीओ कार्यालयातील एमव्हीआय संजय कुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसची उंची निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक होती. नियमानुसार बसची उंची 3.8 मीटर असणे अपेक्षित असताना संबंधित बसची उंची 4.1 मीटर असल्याचे तपासात समोर आले.

चालक आणि वाहकाला अटक

या प्रकरणात पोलिसांनी बसचा चालक पवन आणि वाहक योगेश यांना अटक केली आहे. एफआयआरमध्ये प्रवासी सुनील कुमार यांनी बसमध्ये जळल्यासारखा वास येत असल्याचे सांगितले आहे. त्याचवेळी चालक आणि क्लिनर धूम्रपान करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रवाशांनी धूम्रपानास विरोध केल्यानंतरही दोघांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे सुनील कुमार यांनी सांगितले. आग लागल्यानंतरही बस काही वेळ पुढे जात होती आणि प्रवाशांनी खिडक्या फोडण्यास सुरुवात केल्यानंतर बस थांबवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

‘काही क्षणांत संपूर्ण बस आगीच्या विळख्यात’

प्रवासी रिंकी राजपूत यांनी दुर्घटनेचा थरारक अनुभव सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या वेळी बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. अचानक आरडाओरड सुरू झाली आणि बसमध्ये धुराचे लोट पसरले. परिस्थिती लक्षात येताच प्रवाशांनी खिडक्या फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. रिंकी यांनीही खिडकीतून बाहेर उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र, काही प्रवाशांना वेळेत बाहेर पडता न आल्याने ते बसमध्येच अडकून राहिले. काही क्षणांतच आगीने संपूर्ण बसला वेढल्याचे त्यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती