पुणे : सुमारे पाच वर्षांपूर्वी घडलेल्या कोंढवा परिसरातील कार्तिक अनिल जाधव या अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपीची पुणे सत्र न्यायालयाने पुराव्यांअभावी आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात आरोपीचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानेदेखील फेटाळला होता. दीर्घकाळ चाललेल्या अंतिम सुनावणीत बचाव पक्षातर्फे मांडण्यात आलेला कायदेशीर युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला आणि आरोपांतून निर्दोष मुक्तता केली .दि.२१ सप्टेंबर २०२६ रोजी सत्र न्यायालयाने हा निकाल दिला.
अमोल माणिक पांढरे,अभिषेक दशरथ पवार,अजय नरसिंग गरड,लक्ष्मण उर्फ सोनू शिवाजी गजरमल,युवराज उर्फ साया अशोक हावळे या आरोपीच्या वतीने या खटल्याचे संपूर्ण न्यायालयीन कामकाज व पूर्वतयारी ॲड. आनंद आरू यांनी पाहिली, तर अंतिम युक्तिवाद ॲड. संतोष भागवत यांनी केला. या कायदेशीर लढ्यात त्यांना ॲड.विष्णू सावंत,ॲड.संकेत साळुंखे, ॲड. मुस्कान, ॲड. साहिल इनामदार, ॲड. अभिजित वानखेडे ,ॲड. वेदांत भागवत, ॲड. समृद्ध भागवत, ॲड.प्रतीक कालेकर आणि कपिल गायकवाड यांचे सहकार्य लाभले.
प्रकरणाची पार्श्वभूमी व न्यायालयीन कामकाज:
पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या गंभीर गुन्ह्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता यापूर्वी आरोपीचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता. त्यानंतर पार पडलेल्या अंतिम सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने तपासातील विसंगती, साक्षीदारांच्या साक्षींमधील त्रुटी आणि तांत्रिक बाबींवर सखोल आक्षेप नोंदवले.
अंतिम सुनावणीच्या वेळी बचाव पक्षाने मांडलेली बाजू आणि संशयाचा फायदा आरोपीला मिळणे आवश्यक असल्याचे कायदेशीर मुद्दे गृहीत धरून न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला.या निकालामुळे तब्बल ५ वर्षे 6 महिने प्रलंबित असलेल्या या कायदेशीर लढ्याला पूर्णविराम मिळाला असून आरोपीची कारागृहातून सुटका होत असल्याने बचाव पक्षाच्या वकिलांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.