सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 जिल्हा

येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    24-09-2026 16:00:56

धाराशिव : संकटाच्या काळात राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा निर्णय घेतला असून, येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिली.कळंब तालुक्यातील मलकापूर येथे रामहरी लोमटे आणि संजय लोमटे यांच्या शेतातील नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला.त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मदत देताना पंचनामे कायदेशीर प्रक्रियेनुसार करावे लागतील. मात्र परिस्थिती सरसकट असल्याने मदतीचा निर्णयही सरसकटच असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करावे.दुष्काळाच्या काळात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, मुलांचे शिक्षण आणि अन्नधान्य यांची व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल. शेतकऱ्यांना देण्यात येणारे थेट अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे,असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून, सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत कर्जमाफी सुरू राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या वीजबिलापोटी ४८ हजार कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.दुष्काळाच्या या संकटात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, ही सरकारची भूमिका आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत करेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील, आमदार बसवराज पाटील, राणाजगजीतसिंह पाटील, कैलास घाडगे पाटील, प्रवीण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती