नोएडा : यमुना एक्स्प्रेसवेवर जेवरजवळ खासगी एसी स्लीपर बसला लागलेल्या भीषण आगीत नऊ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेतील शशांक गुप्ता आणि त्यांची आई सुनीता गुप्ता यांची कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. बसमध्ये आग भडकल्यानंतर स्वतःचा जीव वाचवून बाहेर पडण्याऐवजी शशांक यांनी आईला सोडण्यास नकार दिला. आईला बाहेर काढण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करत असतानाच माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
माय-लेकाचा महोबाला जाण्याचा प्रवास ठरला अखेरचा
२८ वर्षीय शशांक गुप्ता हे गुरुग्राममध्ये इंडिगो एअरलाइन्समध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांची ४७ वर्षीय आई सुनीता या गुडघ्यांच्या उपचारासाठी मागील महिनाभरापासून त्यांच्यासोबत गुरुग्राममध्ये राहत होत्या.महोबा जिल्ह्यातील चरखारी येथे शशांक यांच्या काकांना हृदयविकाराचा झटका आल्याने माय-लेकाने तातडीने महोबाला जाण्याचा निर्णय घेतला. रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी खासगी स्लीपर बसमधून प्रवास करण्याचे ठरवले. मात्र, हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील अखेरचा ठरला.
बसला आग लागण्यापूर्वीच जळण्याचा वास
बुधवारी रात्री काश्मिरी गेट, दिल्ली येथून महोबाच्या दिशेने निघालेली बस जेवरजवळ यमुना एक्स्प्रेसवेवरील ३३ किलोमीटरच्या ठिकाणी पोहोचली. याचवेळी बसमध्ये आग लागली. बसमध्ये एकूण ३५ जण प्रवास करत होते.काही प्रवाशांना आग लागण्यापूर्वीच जळल्याचा वास येत असल्याचे जाणवले होते, असा दावा करण्यात आला आहे. याबाबत चालक आणि वाहकाला माहिती देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र, या दाव्यांची अधिकृत तपासातून पडताळणी होणे बाकी आहे.
‘आई बाहेर येईपर्यंत मीही बाहेर पडणार नाही’
आग वेगाने पसरल्यानंतर बसमध्ये धुराचे लोट भरू लागले. प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काहींनी खिडक्या फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तर काही प्रवासी बसच्या पुढील भागाकडे धावले.सुनीता यांना गुडघ्यांचा त्रास असल्याने त्यांना वेगाने हालचाल करता येत नव्हती. अशावेळी शशांकला एकट्याने बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याने आईला सोडून जाण्यास स्पष्ट नकार दिला.‘माझी आई खाली उतरल्याशिवाय मी बाहेर पडणार नाही,’ असे शशांकने सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याने आईला दरवाजाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, धुराचे प्रमाण वाढल्याने दोघांनाही श्वास घेणे कठीण झाले आणि अखेर ते बेशुद्ध पडले.
अंगठीवरून शशांकची ओळख
आगीची तीव्रता मोठी असल्याने मृतदेहांची अवस्था गंभीर झाली होती. त्यामुळे मृतांची ओळख पटवणे पोलिस आणि कुटुंबीयांसमोर मोठे आव्हान होते.शवविच्छेदनानंतर सुनीता गुप्ता यांची ओळख त्यांच्या उंचीवरून करण्यात आली, तर शशांक यांची ओळख त्यांच्या बोटातील अंगठीवरून पटली. मुलाचे आणि पत्नीचे पार्थिव पाहताना वडील नीरज गुप्ता यांना अश्रू अनावर झाले.‘मृत्यू समोर दिसत असतानाही माझ्या मुलाने आईची साथ सोडली नाही,’ असे सांगताना नीरज गुप्ता यांचा कंठ दाटून आला.
३५ पैकी २६ प्रवासी बचावले
बसला लागलेल्या आगीत एकूण नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २६ प्रवासी, चालक आणि वाहक बाहेर पडण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी मृतांची ओळख पटवून सर्व नऊ मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहेत.शशांक आणि सुनीता यांचे पार्थिव चरखारी येथे नेण्यात आले. शशांक यांच्या पश्चात वडील नीरज आणि २२ वर्षीय धाकटा भाऊ निखिल असा परिवार आहे.
शॉर्टसर्किटचा प्राथमिक संशय
आग लागण्यामागे बसच्या एसी यंत्रणेत झालेल्या शॉर्टसर्किटचा प्राथमिक संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. बसमधील दिवे आणि एलईडी लाईट्सच्या वायरिंगवर अतिरिक्त ताण आल्याने विद्युत बिघाड झाला असण्याची शक्यताही तपासली जात आहे.या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आग नेमकी कशामुळे लागली आणि बसमधील सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, याचा तपास केला जात आहे.