पुणे : पुण्यातील गणेश उत्सव पूर्वतयारीच्या सभेमधून विद्यानंद बापट यांना बाहेर काढल्यानंतर आणि सप्टेंबर मध्ये त्यांना मारहाण केली गेल्यामुळे सामान्य पुणेकराला धक्का बसला. मध्यमवर्गीय जेष्ठ नागरिकांना आपला आवाज असा दडपशाहीने दाबला जाणार असेल तर त्या विरोधात उतरायला पाहिजे ही भावना तयार झाली आणि त्यातूनच लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच नावाने लोक एकत्र आले
पुणेकरांच्या पुढाकाराने प्रथम कलाकारकट्टा डेक्कन जिमखाना येथे आंदोलन आणि स्वारगेट येथे मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आणि त्यानंतर लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाच्या पुढाकाराने बालगंधर्व /झाशीची राणी पुतळा चौक ते पुणे महानगरपालिका असा मोठा मोर्चा काढण्यात आला. सामान्य पुणेकर कोणताही राजकीय झेंडा न घेता रस्त्यावर उतरला. या काळात या मंचाच्या पुढाकाराने शहरातील 35 पेक्षा अधिक डॉक्टरांनी मिळून या आरोग्यास अपायकारक आवाजाच्या विरोधात पुणेकरांना आवाहन केले.

14 सप्टेंबर नंतर पोलिसांच्या 112 नंबरवरती तक्रार दाखल केल्यानंतर त्याची फारशी दखल घेतली जात नाही असे लक्षात आल्याने आणि तक्रारदारास त्याचे नाव उघड होईल हि भीती असल्याने नवीन सॉफ्टवेअर फॉर्म तयार करून त्या मार्फत थेट पोलीस आयुक्तांना रियल टाईम ईमेल पाठवण्यात आल्या. या सर्व काळात एकूणच आवाजाची मर्यादा बरीच पाळली गेली त्यामुळे लोकांनाही निश्चितपणे आनंद वाटला. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि त्याआधी एनजीटीच्या कोर्टामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आदेश दिले गेले. यापुढील काळामध्ये हे आदेश दिशादर्शक ठरणार आहेत.
परंतु विसर्जनाच्यादिवशी मात्र अनेक ठिकाणी ही आवाजाची डेसिबल मर्यादा पाळली गेली नसल्याच्या तक्रारी आल्या. पोलिसांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन नंबर जाहीर केले. परंतु अनेक ठिकाणी लोकांचा अनुभव फारसा चांगला नव्हता. तक्रार दाखल केल्यावर थोड्यावेळापुरता आवाज कमी होत होता. अनेक ठिकाणी तक्रारीचे निवारणच होत नव्हते.
या लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाच्या तक्रार निवारण फॉर्म मधून काही माहिती दिसून आली. या लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचातर्फे सॉफ्टवेअर आधारित फॉर्म तयार केला होता त्यातून आयुक्तांना रियल टाईम मिळत होती. त्यातून मिळालेली तक्रारींची माहिती.
पुणे शहर विभागापुरता सारांश (एकूण १५८ नोंदी)
एकूण कल: तक्रारी प्रामुख्याने तीन दिवसांभोवती केंद्रित आहेत:
१४ सप्टेंबर (१९ तक्रारी) — गणेश चतुर्थी / उत्सवाची सुरुवात
२० सप्टेंबर (२७ तक्रारी) — मध्य- उत्सवातील विसर्जन दिन व वीकेंड वाढ
२५ सप्टेंबर (५९ तक्रारी, एकूणपैकी ३७%) – शेवटचा विसर्जनाचा दिवस
*डेसिबल पातळी: * १५८ पैकी ६० तक्रारींमध्ये (३८%) १०० dB किंवा त्याहून अधिक नोंदवले गेले
पोलिस तक्रार: ९१ जणांनी (६१%) पोलिसांकडेही (११२/WhatsApp) तक्रार नोंदवल्याचे सांगितले
हॉटस्पॉट भाग: बाजीराव रोड / नातूबाग गणपती मंडळ या एकाच पट्ट्यातून १८ तक्रारी (एकूणपैकी ~११%) आल्या. इतर वारंवार आढळणारे भाग: कोथरूड (७), हिंगणे खुर्द (५), धनकवडी (४), कोरेगाव पार्क (४), आंबेगाव (४).
सामान्य नागरिक तक्रार करायला बिचकतो ,क्वचितच एखादा हे धाडस करतो ,अश्या स्थितीत हि आकडेवारी पाहता विसर्जनाच्या दिवशी मात्र ‘ बंधमुक्त उर्मट नेत्यांचा कर्णकर्कश्य आवज घुमला आणि त्यांनीच पुणेकर नागरिकांच्या मुलभूत हक्काचा आवज दाबला.
यापुढील काळात पुणेकरांची लढाई ही प्रामुख्याने कर्णकर्कश्य आवाजाविरोधामध्ये असेल मग तो कुठल्याही धर्माचा,जातीचा अथवा राजकीय पक्षाचा कार्यक्रम मिरवणूक असेल, त्याला या मंचातर्फे आणि पुणेकरांकर्फे विरोध केला जाईल. पुण्याच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर मंजुषा नागपुरे आणि सत्ताधारी भाजपचे धीरज घाटे यांनी या विरोधात विधाने केली परंतु पुणेकरांनी आपला आग्रह पोलिसांच्या मदतीने आणि न्यायालयाच्या आदेशाच्या सहाय्याने लावून धरला.
परंतू सायलेंट/ शांतता झोन मार्किंग न करणे, लोखंडी सिलेंडर वाजवणे, अशास्त्रीय ४बेस ४टॉप, निष्क्रिय बेफिकीर प्रदूषण नियंत्रण मंडळ, रोजची कारवाई माहिती जाहीर न करणे, न्यायालयाचे आदेश धुडकावणे ही या प्रशासनाची या विसर्जन काळातील अपयशाची मुख्य कारणे आहेत.
थर्माकोल बंदी, निर्माल्य , मूर्ती विसर्जन नदी पात्रात न करणे , रात्री स्पीकर बंद करणे याबाबत गणेश मंडळानी बदल स्वीकारला आहे , तसाच बदल ही गणेश मंडळे व इतर धार्मिक, राजकीय संस्था कार्यकर्ते स्वीकारतील अशी आशा आहे. या नागरी आंदोलनास आलेले यश हे पहिल्या टप्प्यावरचे असून यातूनच भविष्यातील पुणेकर मंचाचे प्रदूषण मुक्तीचे काम महाराष्ट्रासाठी दिशादर्शनाचे ठरेल अशी आशा आहे.
