मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे. शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनाही या पार्श्वभूमीवर वेग आला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सर्व चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाची पुढील राजकीय दिशा स्पष्ट करताना शरद पवार यांनी सत्ताधारी गटासोबत जाण्याची शक्यता फेटाळून लावली. ‘आम्ही कुठेही जाणार नाही. आम्ही कुणासोबतही जाणार नाही. यायचं असेल तर आमच्यासोबत या,’ अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना तूर्तास ब्रेक लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू होते. त्यातच शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या भेटीनंतर या चर्चांना आणखी उधाण आले होते.
मात्र, आपण सत्ताधारी आघाडीसोबत जाणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. ‘आम्ही सत्तेसोबत जाणार नाही. ज्यांना आमच्यासोबत यायचे आहे, त्यांनी विरोधी पक्षात आमच्यासोबत यावे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे आगामी काळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरोधकांच्या आघाडीतच राहण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, पक्षाच्या बैठकीत राज्यातील दुष्काळ आणि जनतेच्या विविध प्रश्नांवरही चर्चा झाली. सरकारकडून अपेक्षित असलेल्या उपाययोजनांबाबत पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात येणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशाराही त्यांनी दिला.‘आम्हाला भांडण करायचे नाही. मात्र मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू,’ असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका सत्ताधाऱ्यांविरोधात अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. एकीकडे दुष्काळ आणि जनतेच्या प्रश्नांवर आंदोलनाची तयारी, तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची शक्यता फेटाळणारी भूमिका, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.शरद पवार यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणापेक्षा स्वतंत्र राजकीय वाटचालीचे संकेत मिळत आहेत. आता अजित पवार गटाकडून या भूमिकेवर काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.