सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 जिल्हा

नीलम गोऱ्हेंच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, पकड अन् 10 मीटरची दोरी, पाण्याचे कनेक्शनही तोडले

डिजिटल पुणे    28-09-2026 17:02:16

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटेच्या सुमारास एका तरुणाने घुसखोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 26 सप्टेंबर रोजी पहाटे ही घटना घडली. संशयित तरुणाला बंगल्यावरील सुरक्षारक्षक आणि ड्युटीवर तैनात पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून आक्षेपार्ह साहित्य आढळल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने रात्रीच्या सुमारास घराच्या गच्चीवरून बंगल्यात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. सकाळी सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले.

बॅगेत धक्कादायक साहित्य

पोलिसांनी संशयिताच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये हातोडा, पकड, हातमोजे आणि सुमारे 10 मीटर लांबीची दोरी आढळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर बंगल्यात प्रवेश करण्यापूर्वी घरातील पाण्याच्या टाकीचे कनेक्शन बंद करून ते तोडल्याची माहितीही समोर आली आहे.

वेगवेगळ्या नावांची ओळखपत्रे

संशयित तरुणाने आपण विद्यार्थी असल्याचा दावा केल्याची माहिती आहे. मात्र, त्याच्याकडे वेगवेगळ्या नावांची ओळखपत्रे आढळल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्याची ओळख, बंगल्यात प्रवेश करण्यामागचा उद्देश आणि त्याच्याकडे आढळलेल्या साहित्याचा नेमका वापर कशासाठी होणार होता, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.घटनेच्या वेळी डॉ. नीलम गोऱ्हे या निवासस्थानी उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला.

घुसखोरीमागचा नेमका हेतू काय?

लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानी पहाटेच्या वेळी अशा प्रकारे प्रवेश करून हातोडा, पकड आणि दोरीसारखे साहित्य सोबत ठेवण्यामागे नेमका काय हेतू होता, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. संशयित चोरीच्या उद्देशाने आला होता की या घटनेमागे अन्य काही कारण आहे, याचा उलगडा पोलिसांच्या तपासातून होणे अपेक्षित आहे.

दरम्यान, संशयिताला सोडवण्यासाठी काही राजकीय व्यक्तींकडून पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे पोलिसांनी सर्व शक्यता तपासून या प्रकरणाचा सखोल तपास करणे गरजेचे आहे.या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताच्या हालचाली, त्याची पार्श्वभूमी आणि घुसखोरीमागील उद्देश याबाबत तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती