अहिल्यानगर : जामखेड तालुक्यातील कला केंद्रातील अंतर्गत वादातून गर्भवती महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंकी हनुमंत काटकर असे मृत महिलेचे नाव असून ती जामखेड येथील कला केंद्रात काम करत असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास करताना महामार्गावरील तब्बल 11 तासांचे CCTV फुटेज तपासून पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पिंकी काटकर हिचे अपहरण करून तिला बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा परिसरात एका ठिकाणी नेण्यात आले. तेथे तिच्यावर मारहाण करण्यात आली. मारहाणीत ती बेशुद्ध झाल्यानंतर आरोपींनी ती मृत झाल्याचे समजले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला चारचाकी वाहनातून दुसऱ्या राज्याच्या दिशेने नेण्यात येत होते.
दरम्यान, धुळे परिसरात एका निर्जन ठिकाणी वाहन थांबवून महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर धुळे पोलिसांनी महामार्गावरील संशयास्पद वाहनांच्या हालचालींचा तपास सुरू केला. तब्बल 11 तास CCTV फुटेजची छाननी केल्यानंतर तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला.
या प्रकरणात एकूण सहा आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी चार जणांना जामखेड येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रातून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये सरफराज उर्फ शफिक मोमीन, आरिफ उर्फ खुज्या शेख, स्वाती उर्फ आरती कुऱ्हाडे आणि लक्ष्मी पवार यांचा समावेश आहे.तर फारुख शेख आणि रोहिणी जाधव हे दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून चौकशीदरम्यान हत्येप्रकरणी महत्त्वाची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
प्राथमिक तपासात या हत्येमागे जामखेड येथील कला केंद्रातील अंतर्गत वाद असल्याचे समोर आले आहे. मृत पिंकी काटकर ही मूळची रायगड येथील असल्याची माहिती असून ती जामखेडमधील कला केंद्रात काम करत होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.