पुणे : गणेशोत्सवाची सांगता होऊन काही दिवस झाले असले तरी ढोल-ताशा पथकांच्या वादनाची आणि त्यातील कलाकारांची चर्चा अद्याप सोशल मीडियावर सुरू आहे. पुण्यातील प्रसिद्ध ‘कलावंत ढोलताशा पथका’ संदर्भात अभिनेते विद्याधर जोशी यांनी फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या पोस्टवर अभिनेत्री श्रुती मराठे हिने थेट कमेंट करत उत्तर दिलं. त्यानंतर विद्याधर जोशी यांनीही श्रुतीच्या प्रतिक्रियेवर स्पष्टीकरण दिलं आहे.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये ‘कलावंत ढोलताशा पथका’चा सहभाग दरवर्षी पाहायला मिळतो. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार या पथकाचे सदस्य आहेत. श्रुती मराठे, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, सौरभ गोखले यांच्यासह अनेक कलाकार ढोल-ताशा वाजवताना दिसतात. या कलाकारांच्या वादनाचे फोटो आणि व्हिडीओ गणेशोत्सवादरम्यान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
याच पार्श्वभूमीवर विद्याधर जोशी यांनी फेसबुकवर पोस्ट करत कलाकारांच्या वादनाबाबत दोन प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विचारलं की, पुण्यातील कलाकारांच्या पथकातील सदस्य विसर्जन मिरवणुकीत प्रत्यक्षात किती वेळ वादन करतात? तसेच सोशल मीडियावरील रिल्समध्ये ज्या जोशात ते वादन करताना दिसतात, त्याच उत्साहात ते सातत्याने वादन करतात का?
श्रुती मराठेने दिलं थेट उत्तर
विद्याधर जोशी यांच्या या पोस्टवर श्रुती मराठेने कमेंट करत आपली भूमिका स्पष्ट केली. श्रुतीने सांगितलं की, पथकातील कलाकार तब्बल दीड महिन्याची तयारी करतात. गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत जवळपास १४ वेळा वादन केलं जातं आणि विसर्जनाच्या दिवशी जवळपास साडेसात तासांची मिरवणूक असते.
‘आम्हाला वादन करायला मनापासून आवडतं,’ असं सांगत श्रुतीने पुढील वर्षी प्रत्यक्ष येऊन पथकाचं वादन पाहण्याचं आवाहनही केलं. तसेच केवळ फेसबुकवर प्रश्न उपस्थित करून त्याची उत्तरं मिळत नाहीत, असा टोला तिने लगावला.
विद्याधर जोशींचंही स्पष्टीकरण
श्रुतीच्या कमेंटनंतर विद्याधर जोशी यांनी पुन्हा प्रतिक्रिया देत तिच्या उत्तराबद्दल आभार मानले. श्रुतीने दिलेल्या सुरुवातीच्या माहितीमधूनच आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्यक्ष येऊन पाहण्याची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.तसंच, सोशल मीडियावरील रिल्स पाहिल्यामुळे आपल्याला प्रश्न पडले होते, हे त्यांनी मान्य केलं. आपल्या पोस्टमुळे श्रुतीला राग आला असेल, तर तो योग्यच असल्याचं म्हणत विद्याधर जोशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.या संपूर्ण प्रकरणामुळे कलावंत ढोलताशा पथक, त्यातील कलाकारांचं वादन आणि विद्याधर जोशी-श्रुती मराठे यांच्यातील सोशल मीडिया संवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.