मुंबई : निवडणूक आयोगाच्या कारभारावरून राजकीय वातावरण तापले असताना आता ठाकरे बंधूंनी संयुक्तपणे आंदोलनाची घोषणा केली आहे. ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात महामोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर २९ सप्टेंबर रोजी ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चाची संपूर्ण रूपरेषा स्पष्ट केली.
राज ठाकरे यांच्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता भायखळा येथून मोर्चाला सुरुवात होईल. हा मोर्चा मुंबई महानगरपालिकेच्या परिसरात पोहोचल्यानंतर तेथे व्यासपीठ उभारून सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या कारभारासंदर्भातील भूमिका यावेळी मांडली जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
पक्षांचे झेंडे नाहीत; हातात असेल फक्त तिरंगा
हा मोर्चा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधातील असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. सर्व राजकीय पक्षांना या मोर्चासाठी निमंत्रण देण्यात येणार असून सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे.
विशेष म्हणजे, मोर्चात कोणत्याही पक्षाचे झेंडे नसतील. सहभागींच्या हातात केवळ तिरंगा असेल, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. हा लढा लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.
ईव्हीएमच्या मुद्द्यावरही भूमिका मांडणार
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा ठाकरे बंधूंकडून यापूर्वीही उपस्थित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, २०१७-१८ मध्ये आपण ईव्हीएमच्या मुद्द्यावर अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. या सर्व विषयांवर ४ ऑक्टोबरच्या मोर्चात सविस्तर भाष्य केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या आरोपावर राज ठाकरेंचा मिश्कील टोला
विरोधकांना निवडणुकीतील पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडायचे आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. याबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्कील शैलीत उत्तर दिले. “खाई त्याला खवखवे,” या एका वाक्यात त्यांनी भाजपच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.आता ४ ऑक्टोबरच्या ठाकरे बंधूंच्या महामोर्चाला कोणकोणते राजकीय पक्ष आणि नेते उपस्थित राहतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.