सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 क्राईम

प्रदीप पूर्णेकरांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत; ‘एक तर अध्याय संपेल, नाहीतर नवीन अध्याय सुरू होईल’ म्हणत नेमका कोणता इशारा?

डिजिटल पुणे    30-09-2026 13:24:31

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येने ठाण्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. मानपाडा परिसरातील गणेशनगर येथे मंगळवारी रात्री त्यांच्यावर गोळीबार तसेच धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, हत्येनंतर पूर्णेकर यांनी केलेली शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

पूर्णेकर यांनी हत्येच्या काही तास आधी शेअर केलेल्या एका रिलमध्ये, ‘एक बडा डाव खेलना है इस बार... जादा से जादा क्या होगा, या तो अपना अध्याय समाप्त, या फिर एक नये अध्याय का प्रारंभ’ असा ऑडिओ वापरला होता. या पोस्टनंतर त्यांनी आणखी एक रिल शेअर केली होती. त्यामध्ये अडचणीच्या काळात केलेल्या मदतीची जाण ठेवणारे आणि विश्वासघात करणारे यांच्यातील फरक अधोरेखित करण्यात आला होता.

या सोशल मीडिया पोस्टमुळे पूर्णेकर यांना आधीपासून कोणत्या प्रकारच्या धोक्याची जाणीव होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, या पोस्टचा त्यांच्या हत्येशी थेट संबंध आहे का, हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. त्यांच्या भाऊ जयनाथ पूर्णेकर आणि मुलगा राम पूर्णेकर यांनी काही व्यक्तींवर हत्येच्या कटाचा आरोप केला आहे. हे आरोप तपासाचा भाग असून, त्याची स्वतंत्रपणे पडताळणी होणे बाकी आहे.

प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला हल्ल्याचा घटनाक्रम

पूर्णेकर यांच्या कार्यालयाजवळ व्यवसाय करणाऱ्या रेणू प्रजापती या महिलेने हल्ल्यानंतर पोलिसांना माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आरोपींकडे धारदार शस्त्र पाहिले तसेच हल्ल्यानंतर आरोपी पळून जाताना पाहिले.

रेणू प्रजापती गेल्या काही वर्षांपासून पूर्णेकर यांच्या कार्यालयाशेजारी ब्लाऊज शिवण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्णेकर यांच्या मृत्यूने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली असून, ‘आमचा आधार गेला’, अशा भावना काही नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.पोलिसांकडून आता हत्येचा नेमका हेतू, हल्ल्यामागील व्यक्ती आणि सोशल मीडिया पोस्टचा या घटनेशी काही संबंध होता का, या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती