पुणे : विद्यार्थिनींच्या नवकल्पनांना उद्योगविश्वाची दिशा देत त्यांच्यामध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्यासाठी भारती विद्यापीठ्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेन, पुणे आणि एनसीन एन्त्रेप्रेन्युअरशिप, स्टार्टअप अँड इनोव्हेशन फोरम, पुणे यांच्यात दि. २९ सप्टेंबर रोजी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रत्यक्ष व्यवसायाच्या संधींमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कराराचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना केवळ रोजगाराच्या संधी शोधणारे नव्हे तर रोजगारनिर्माते बनण्यासाठी सक्षम करणे हा आहे. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना शाश्वत आणि विस्तारक्षम स्टार्टअपमध्ये रूपांतरित करण्यासाठी इन्क्युबेशन सपोर्ट, तज्ज्ञ मार्गदर्शन, कौशल्यविकास आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यावेळी प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्ये आणि नवोन्मेषी विचारसरणी विकसित करण्यासाठी हा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरेल. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना योग्य व्यासपीठ आणि मार्गदर्शन मिळाल्यास त्या कल्पना भविष्यात यशस्वी उद्योगांचे रूप घेऊ शकतात.”
एनसीन फोरमचे संचालक डॉ. श्रीकांत कल्लूरकर आणि श्री संजय जगताप यांनी सांगितले की, महाविद्यालयाच्या सहकार्याने नवप्रवर्तक आणि इच्छुक उद्योजकांना त्यांच्या कल्पनांचे यशस्वी स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य दिले जाईल.
या सामंजस्य करारावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव, एनसीन फोरमचे संचालक डॉ. श्रीकांत कल्लूरकर, श्री. संजय जगताप, आयआयसी समन्वयक डॉ. सिमी खान आणि उद्योजकता विकास विभागाचे प्रा. एम. व्ही. कासार यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपप्राचार्य डॉ. ए. एम. पवार, सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते.
या सहकार्यांतर्गत प्रशिक्षण, तंत्रज्ञान सहाय्य, नेटवर्किंग, निधीच्या संधी, प्री-इन्क्युबेशन आणि इन्क्युबेशन सेवा उपलब्ध होतील. तसेच कार्यशाळा, चर्चासत्रे, स्टार्टअप बूटकॅम्प, बिझनेस प्लॅन स्पर्धा, कौशल्यविकास आणि नेटवर्किंग कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित केले जाणार आहेत.या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनांना दिशा, नवोन्मेषाला व्यासपीठ आणि उद्योजकतेला नवी उंची मिळण्यास मदत होणार आहे.