पुणे : ‘आंगन का मिलन’ अभियानांतर्गत भाजपा महिला मोर्चा, पुणे शहर सचिव तथा कोथरूड उत्तर मंडल प्रभारी सौ. यामिनी अमोल मठकरी यांच्या पुढाकाराने बाणेर परिसरातील विविध अंगणवाड्यांना भेट देण्यात आली. यावेळी उत्तर कोथरूड मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंगणवाडी सेविका, गर्भवती माता, स्तनदा माता आणि पालकांशी संवाद साधत अंगणवाडीच्या कामकाजाची तसेच बालकांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती जाणून घेतली.

या भेटीदरम्यान गेल्या २२ वर्षांपासून अंगणवाडीत कार्यरत असलेल्या सेविका ताईंनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळातील अनुभव सांगितला. मागील १२ ते १३ वर्षांत अंगणवाडीच्या व्यवस्थेत, पायाभूत सुविधा आणि बालकांना उपलब्ध होणाऱ्या विविध सेवांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती त्यांनी दिली. तसेच अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबतही उपस्थितांशी संवाद साधला.

अंगणवाडी सेविका ताईंच्या वर्षानुवर्षांच्या योगदानाची दखल घेत सौ. यामिनी मठकरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड करत त्यांच्या कार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी अंगणवाडीतील चिमुकल्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. बालकांसोबत संवाद साधत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

याप्रसंगी कोथरूड उत्तर मंडळाचे अध्यक्ष सचिन पाषाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सौ. अस्मिता करंदीकर, कोथरूड उत्तर मंडळाच्या अध्यक्षा सौ. वैदेही बापट यांच्यासह मंडळातील पुरुष व महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

अंगणवाडी सेविकांचे योगदान, बालकांना मिळणाऱ्या सुविधा आणि माता-पालकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ‘आंगन का मिलन’च्या माध्यमातून अंगणवाडी आणि समाजातील संवाद अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सौ. यामिनी अमोल मठकरी..
भाजपा महिला मोर्चा, पुणे शहर सचिव
प्रभारी-आंगन का मिलन-कोथरूड उत्तर मंडल