पुणे :बेळगावकरांनी पुण्यातील बेळगावकरांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे या संस्थेने विश्वास, पारदर्शकता आणि आर्थिक शिस्तीच्या बळावर यशाची नवी उंची गाठली आहे. संस्थेला ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त झाला असून, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा स्व. आमदार शिवाजीराव भोसले ‘आदर्श पतसंस्था पुरस्कार’ सन २०२५-२६ मध्ये गट क्रमांक १, शहर विभागातून प्रथम क्रमांकाचा बहुमान संस्थेला जाहीर झाला आहे. या गौरवामुळे बेळगाव नागरी पतसंस्थेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २७ सप्टेंबर २०१६ रोजी क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान, स्व. सुषमा स्वराज बचत गट व प्रशिक्षण केंद्र, वडगाव खुर्द, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. मोहन लक्ष्मण पाटील होते.
यावेळी उपाध्यक्ष श्री. परशुराम भरमाणी चौगुले, संचालक श्री. शिवाजीराव जोतिबा पाटील, श्री. गावडु विष्णू पाटील, श्री. नारायण रामचंद्र पाटील, श्री. पांडुरंग बाबुराव कुलम, श्री. दत्ताराम भेकणे, तसेच संचालिका सौ. स्नेहा पांडुरंग मुचंडी व सौ. गौरी राजेंद्र सुतार,सौ. निलीमा जगताप, सौ.साक्षी पाटील कर्मचारी यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते.
अध्यक्ष श्री. मोहन पाटील यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करून सभेच्या कामकाजास सुरुवात केली. यावेळी संस्थेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सभासदांच्या सोयीसाठी नवीन उपशाखा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय
संस्थेच्या सन २०२३ ते २०२८ या कालावधीतील विद्यमान संचालक मंडळाने पुणे परिसरात वास्तव्यास असलेल्या बेळगावकर सभासदांच्या सोयीसाठी नवीन उपशाखा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा संस्थेचे अध्यक्ष श्री. मोहन पाटील यांनी केली.
नर्हे, वडगाव बुद्रुक, आंबेगाव बुद्रुक, दत्तनगर, कात्रज, संतोषनगर, धायरी, माणिकबाग, वारजे-माळवाडी, हिंगणे तसेच सिंहगड परिसरात मोठ्या संख्येने बेळगावकर वास्तव्यास आहेत. या भागातील बेळगावकर सभासदांना संस्थेच्या आर्थिक सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी दूरवर जावे लागू नये आणि संस्थेच्या सेवा सभासदांच्या अधिक जवळ पोहोचाव्यात, या उद्देशाने नवीन उपशाखा सुरू करण्यात येणार आहे.
संस्थेच्या वाढत्या सभासदसंख्येसोबत त्यांच्या आर्थिक गरजाही वाढत असून, त्यांना अधिक सुलभ आणि सभासदाभिमुख सेवा देण्यासाठी संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. संस्थेच्या विस्ताराच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
सभासदांच्या ज्ञानवृद्धीसाठी प्रशिक्षण
सभेच्या निमित्ताने पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या माध्यमातून सभासदांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सहकार आयुक्त कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले मा. श्री. दिलीप सोनावणे, मुख्य प्रशिक्षण अधिकारी सौ. निलाक्षी राऊत आणि प्रमुख व्याख्याते मा. श्री. अरुण रोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अहमदनगर जिल्हा बँकेत जनरल मॅनेजर म्हणून सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले श्री. अरुण रोडे यांनी सभासदांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, KYC प्रक्रिया, कर्जविषयक शिस्त आणि कर्जाची नियमित परतफेड या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. संस्थेची आर्थिक शिस्त आणि सभासदांचा सक्रिय सहभाग यामुळेच सहकारी संस्थेची भक्कम पायाभरणी होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
२८ लाखांचा नफा; सभासदांना १२ टक्के लाभांश
संस्थेने आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत रु. २८ लाख ४१ हजार १८० रुपये १२ पैसे इतका नफा मिळविला. संस्थेच्या या आर्थिक प्रगतीचा लाभ सभासदांनाही देण्यात आला असून, १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
सभासदांचा विश्वास, संचालक मंडळाचे सक्षम नेतृत्व आणि कर्मचारी वर्गाची मेहनत यामुळे संस्थेने आर्थिक क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केले आहे. संस्थेच्या कारभारात पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि सभासदाभिमुख सेवा यांना प्राधान्य देण्यात येत आहे.
सामूहिक प्रयत्नांना पुरस्काराची पावती
संस्थेला मिळालेला ‘आदर्श पतसंस्था पुरस्कार’ हा केवळ संस्थेचा सन्मान नसून, संस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सभासदाच्या योगदानाची पावती असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. संचालक मंडळाचे मार्गदर्शन, कर्मचारी वर्गाची कार्यतत्परता आणि सभासदांचे सातत्यपूर्ण सहकार्य या त्रिसूत्रीच्या बळावर संस्थेने ही उल्लेखनीय वाटचाल केली आहे.
‘विश्वासातून विकास आणि विकासातून सभासदांचा समृद्धीचा मार्ग’ या भावनेने कार्यरत असलेल्या बेळगाव नागरी सहकारी पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस या पुरस्कारामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे. भविष्यातही सभासदांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन अधिक चांगल्या सेवा देत संस्थेच्या प्रगतीची ही यशस्वी घोडदौड अशीच सुरू ठेवण्याचा निर्धार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
