सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 DIGITAL PUNE NEWS

ललित प्रभाकरला कसाबच्या भूमिकेत पाहून प्राजक्ता माळी म्हणाली, ‘आदित्यपेक्षा कसाबचं पात्रच जास्त आवडलं’; ‘प्रहार’ 16 ऑक्टोबरला होणार रिलीज

डिजिटल पुणे    01-10-2026 19:05:49

मुंबई : अभिनेता ललित प्रभाकर आपल्या अभिनयातील वैविध्यामुळे कायम चर्चेत असतो. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील आदित्यच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या ललितने आता आपल्या ‘चॉकलेट बॉय’च्या प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळी भूमिका साकारली आहे. आगामी ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटात तो अजमल कसाबच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ललितच्या लूक आणि अभिनयाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

ललितचा ट्रेलर पाहिल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर खास प्रतिक्रिया दिली. ललित आणि प्राजक्ता यांची मैत्री जुनी असून दोघांनी यापूर्वीही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे ललितच्या या वेगळ्या भूमिकेचं कौतुक करताना प्राजक्ताने त्याची तुलना थेट ‘जुळून येती रेशीमगाठी’मधील आदित्यच्या भूमिकेशी केली.

प्राजक्ताने आपल्या इन्स्टा स्टोरीवर ललितच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं, “मला तू आदित्यपेक्षा कसाबच्या भूमिकेतच का जास्त आवडलाय कळेना.” पुढे तिने ट्रेलरचं कौतुक करत, “असं वाटतंय हा ट्रेलर तुझ्यासाठी बनलाय, ललित,” असंही म्हटलं.

मात्र याच पोस्टमध्ये प्राजक्ताने ललितची मिश्कीलपणे फिरकीही घेतली. “पण तुझ्यामुळेच मी सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहू शकणार नाहीए,” असं तिने म्हटलं. ललित आणि प्राजक्ता यांच्या आगामी ‘शुभमंगलम जोडी दंगलम’ या सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्राजक्ताने ही मजेशीर प्रतिक्रिया दिल्याचं बोललं जात आहे.

राजकुमार राव साकारणार उज्ज्वल निकमांची भूमिका

‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’मध्ये अभिनेता राजकुमार राव ज्येष्ठ सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यासह निकम यांच्या महत्त्वाच्या न्यायालयीन लढ्यांवर चित्रपटाची कथा आधारित आहे. ललित प्रभाकर अजमल कसाबची भूमिका साकारत असून वामिका गब्बी, जयदीप अहलावत आणि सिकंदर खेर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन अविनाश अरुण यांनी केलं आहे.

‘प्रहार’ कधी होणार रिलीज?

‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा चित्रपट आधी 7 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख बदलून आता 16 ऑक्टोबर 2026 ही तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे दसऱ्याच्या काळात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती