सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिवेआगरची सहल ठरली आयुष्यभराची काळी आठवण; आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह आळंदीत दाखल, पालकांचा आक्रोश
 शहर

दिवेआगरची सहल ठरली आयुष्यभराची काळी आठवण; आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह आळंदीत दाखल, पालकांचा आक्रोश

डिजिटल पुणे    02-10-2026 12:08:02

आळंदी : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या भीषण दुर्घटनेने आळंदीवर शोककळा पसरली आहे. सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे त्यांचे मृतदेह आळंदीमध्ये आणण्यात आले. रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवताना पालकांना अश्रू अनावर झाले. आपल्या मुलांना आनंदाने सहलीसाठी पाठवलेल्या पालकांवर काही तासांतच दुःखाचा डोंगर कोसळला.

आळंदी येथील विनर्स अकॅडमीचे अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी तसेच शिक्षक असे एकूण 48 जण दिवेआगर येथे सहलीसाठी गेले होते. यामध्ये 42 विद्यार्थी आणि सहा शिक्षकांचा समावेश होता. मात्र, समुद्रातील भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ही सहल दुर्दैवी ठरली. समुद्रात पोहताना काही विद्यार्थी बुडू लागल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी इतर विद्यार्थी पाण्यात उतरले. या दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला.

दुर्घटनेनंतर सर्व मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर श्रीवर्धन जिल्हा उपरुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया करण्यात आली. पहाटे चार वाजेपर्यंत शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून आळंदीच्या दिशेने रवाना करण्यात आले.

दरम्यान, सहलीसाठी गेलेल्या इतर विद्यार्थ्यांची बसही गुरुवारी रात्री दिवेआगरहून आळंदीच्या दिशेने निघाली. शुक्रवारी पहाटे बस आळंदीत पोहोचली. आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी दिवेआगरला गेलेले विद्यार्थी आणि शिक्षक मात्र काळजाला चटका लावणाऱ्या आठवणी घेऊन परतले. आळंदीत मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची मोठी गर्दी झाली असून परिसरात अत्यंत शोकाकूल वातावरण आहे. पालक आणि नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे.

अदिती तटकरे यांची कुटुंबीयांना भेट

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी श्रीवर्धन येथे जाऊन मृत विद्यार्थ्यांच्या पालकांची आणि नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. दिवेआगर हा सुरक्षित समुद्रकिनारा मानला जात असतानाही अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.

निसर्गाच्या मर्यादा आणि समुद्रातील परिस्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. या कठीण प्रसंगी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण सरकार उभे असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या बससोबत पोलीस कर्मचारी का नव्हता? तटकरे संतापल्या

दुर्घटनेनंतर विद्यार्थ्यांची बस रात्री दिवेआगरहून ताम्हिणी घाट मार्गे आळंदीला रवाना झाली. विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था हादरलेली असताना आणि बस रात्रीच्या वेळी घाटमार्गाने प्रवास करत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस कर्मचारी सोबत का देण्यात आला नाही, असा सवाल अदिती तटकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केला.विद्यार्थ्यांची बस रात्री ताम्हिणी घाटातून जाणार असल्याची माहिती असतानाही सुरक्षेची व्यवस्था न केल्याबद्दल त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.

दिवेआगरमध्ये नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, सहलीत 25 मुलं, 17 मुली आणि सहा शिक्षक सहभागी झाले होते. समुद्रात भरतीचे पाणी असताना काही विद्यार्थी पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने काही विद्यार्थी बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी काही जण पुढे गेले; मात्र या प्रयत्नात आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत विद्यार्थ्यांची नावे

1. तन्मय दत्तात्रय वहीले

2. सुमित भरत अहिरे

3. प्रणव रामदास बनसोडे

4. कैवल्य सतीश वासनकर

5. राजवीर युवराज वहीले

6. यश किरण वानखेडे

7. सोहम तुकाराम भांडवलकर

8. कौस्तुभ संदीप दौंड

मृत सर्व विद्यार्थ्यांचे वय 16 वर्षे असून ते पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेमुळे आठ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण आळंदी शोकसागरात बुडाली आहे.


 Give Feedback



 जाहिराती