सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिवेआगरची सहल ठरली आयुष्यभराची काळी आठवण; आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह आळंदीत दाखल, पालकांचा आक्रोश
 क्राईम

स्वारगेट एसटी स्टँडवर लॅपटॉप-मोबाईल असलेली बॅग लंपास; सीसीटीव्हीच्या आधारे बॅग चोरणारा आरोपी जेरबंद; ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

डिजिटल पुणे    02-10-2026 13:43:15

पुणे : स्वारगेट एसटी बसस्थानक परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या कट्ट्यावर ठेवलेली लॅपटॉपची बॅग चोरून नेणाऱ्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. पोलिसांनी आरोपीकडून चोरीचा लॅपटॉप व मोबाईल असा सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत ही कारवाई केली.

दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास तक्रारदार स्वारगेट एसटी बसस्थानक परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ आले होते. त्यांनी लॅपटॉप असलेली बॅग स्वच्छतागृहाच्या कट्ट्यावर ठेवली आणि काही वेळासाठी वॉशरूममध्ये गेले. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने लॅपटॉपची बॅग लंपास केली.

काही वेळाने तक्रारदार बाहेर आल्यानंतर बॅग जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी परिसरात शोध घेतला; मात्र बॅग मिळून आली नाही. त्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

गुन्ह्याचा तपास करताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विकास मरसळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. फुटेजच्या माध्यमातून संशयित व्यक्तीची हालचाल आणि त्याचा मार्ग शोधण्यात आला.

दरम्यान, पोलिस अंमलदार काशीनाथ कुडकळकर यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत असताना संशयित आरोपीचे फोटो मिळवले. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली तसेच संशयिताच्या हालचालींचा माग काढण्यास सुरुवात केली.

दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना जंगली महाराज रस्त्याजवळ संशयित व्यक्ती आढळून आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव राजू सोमाजी सावंत (वय ५६, रा. तासगाव रोड, चांदोली वसाहत, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) असल्याचे सांगितले.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने स्वारगेट एसटी बसस्थानक परिसरातून लॅपटॉपची बॅग चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेला लॅपटॉप व मोबाईल असा एकूण सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या कारवाईमुळे स्वारगेट परिसरात प्रवाशांच्या सामानावर नजर ठेवून चोरी करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी वेळीच जेरबंद केले आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांनी आपले मोबाईल, लॅपटॉप, बॅग तसेच इतर मौल्यवान वस्तू विनाकारण ठेवू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ही कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त राजेंद्र भोसले, परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विकास मरसळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस अंमलदार स्मिता सिताप आणि पोलिस अंमलदार काशीनाथ कुडकळकर करीत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती