सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिवेआगरची सहल ठरली आयुष्यभराची काळी आठवण; आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह आळंदीत दाखल, पालकांचा आक्रोश
 शहर

‘चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून समुद्रात गेलो नाही अन् वाचलो’; आठ मित्र डोळ्यांदेखत लाटांमध्ये गेले, बचावलेल्या विद्यार्थ्याचा थरकाप उडवणारा अनुभव

डिजिटल पुणे    02-10-2026 18:51:13

आळंदी : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी झालेल्या भीषण दुर्घटनेत आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेतून बचावलेल्या सोहम गोविंद गोरे या विद्यार्थ्याने सांगितलेला घटनाक्रम काळजाचा ठोका चुकवणारा आहे. “समुद्राच्या पाण्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेला त्रास होतो म्हणून मी पाण्यात गेलो नाही. काठावरच थांबलो आणि त्यामुळे माझा जीव वाचला. मात्र माझे आठ मित्र डोळ्यांदेखत लाटांमध्ये वाहून गेले,” अशी व्यथा सोहमने व्यक्त केली.

आळंदीतील स्मशानभूमीत सुमित अहिरे, तन्मय वहिले, कैवल्य वासनकर आणि प्रणव बनसोडे या विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सोहम आपल्या आई-वडिलांसोबत उपस्थित होता. गेल्या अनेक वर्षांपासून सोबत शिकणारे आणि खेळणारे मित्र गमावल्याची वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

सोहमच्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सुमारे तीन वाजता आळंदीतून विद्यार्थी आणि शिक्षक सहलीसाठी निघाले होते. प्रथम रायगड किल्ल्याला भेट देण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सुमारास दिवेआगरकडे रवाना होऊन सायंकाळी समुद्रकिनारी पोहोचले.

दिवेआगर येथे पोहोचल्यानंतर काही विद्यार्थी समुद्रात जाण्यासाठी गेले, तर इतरांना काठावर थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोहमने त्वचेला त्रास होण्याच्या भीतीने समुद्रात न जाण्याचा निर्णय घेतला. काही वेळातच समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आणि विद्यार्थ्यांना जोरदार लाटांचा तडाखा बसला.

अचानक परिस्थिती बिघडली

सोहमच्या म्हणण्यानुसार, सुमारे १६ विद्यार्थी आणि काही शिक्षक समुद्राच्या पाण्यात गेले होते. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने काही विद्यार्थी समुद्राच्या दिशेने वाहू लागले. शिक्षक, स्थानिक नागरिक आणि पोहता येणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. काही विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले, तर काही जण स्वतःहून पाण्याबाहेर आले. मात्र आठ विद्यार्थी समुद्रात बुडाले.

घटना घडत असताना सोहम काही अंतरावर असल्याने सुरुवातीला त्याला नेमके काय घडले हे समजले नाही. मात्र पोलिस आणि स्थानिक नागरिकांचा आरडाओरडा ऐकून तो घटनास्थळी धावला. त्यावेळी आपल्या सोबतचे विद्यार्थी समुद्रात बुडाल्याचे समोर येताच त्याला मोठा धक्का बसला.

‘क्षणात सगळं बदललं’

“काही वेळापूर्वी ज्यांच्यासोबत खेळत होतो, गप्पा मारत होतो, तेच मित्र अचानक आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नव्हता. हातापायांचा थरकाप उडाला. शिक्षक आणि पोलिसांनी आम्हाला सुरक्षित ठिकाणी नेले. मात्र हा प्रसंग आयुष्यभर विसरता येणार नाही,” असे सोहमने सांगितले.

दिवेआगरमधील स्थानिक नागरिक, पोलिस आणि कार्यकर्त्यांनी बचावलेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेतली. आळंदी नगरपरिषद आणि पोलिसांनीही विद्यार्थ्यांची फोनवरून चौकशी केली. सोहमचे वडील आणि आळंदीतील काही नागरिक त्यांना घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.

दहा वर्षांच्या मैत्रीचा अंत

“गेल्या दहा वर्षांपासून आम्ही एकत्र शिकलो, खेळलो आणि अनेक आठवणी जपल्या. रात्रभर ज्यांच्यासोबत होतो, तेच मित्र आता आपल्यात नाहीत, ही कल्पनाच मन सुन्न करणारी आहे,” असे सांगताना सोहमला अश्रू अनावर झाले.


 Give Feedback



 जाहिराती