पुणे : महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विचार विभागातर्फे पुण्यातील काँग्रेस भवन येथे २ ऑक्टोबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या विचार विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन प्रवीण डावर यांनी ‘गांधीजी आणि गांधीपूर्व कालखंड’ या विषयावर अतिशय प्रभावी व्याख्यान दिले. एकोणिसाव्या शतकातील भारताचा सामाजिक-राजकीय इतिहास, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना यांचा साक्षेपी मागोवा घेत कॅप्टन डावर यांनी दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लोकमान्य टिळक आणि गोपाळ कृष्ण गोखले यांसारख्या कॉँग्रेसच्या सुरुवातीच्या दिग्गज नेत्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. काँग्रेसचा समृद्ध इतिहास आणि आधुनिक भारताच्या उभारणीतील तिचे अमूल्य योगदान जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
या कार्यक्रमाला पुणे पूर्व शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विचार विभागाचे अध्यक्ष खलील सय्यद आणि उपाध्यक्ष अनंत राऊत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या विचार विभागाचे राष्ट्रीय संयोजक राज कुलकर्णी, पुण्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते गोपाळ तिवारी, प्रदेश कॉँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार,पुणे पूर्व शहर विचार विभागाचे अध्यक्ष उत्पल व. बा. , पुणे ग्रामीण (दक्षिण) चे अध्यक्ष लहू निवंगुणे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, विचार विभाग पुणे ग्रामीणचे अध्यक्ष अमित कोहळे, विचार विभाग पुणे पश्चिमचे अध्यक्ष उमेश ठाकूर, विचार विभागाचे सरचिटणीस सुदर्शन खरात, विचार विभाग युवा शाखेचे अध्यक्ष राहुल शिंपले यांच्यासह प्रदेश काँग्रेस विचार विभागाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशांत जगताप यांनी काँग्रेसविषयी जनमानसात असलेल्या धारणांमध्ये आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी पक्षाच्या राज्य व जिल्हास्तरीय संघटनांनी विचार विभागाशी समन्वय साधून काम करण्याची गरज व्यक्त केली. पुणे पूर्व शहर विचार विभागाचे अध्यक्ष उत्पल व. बा. यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पिंपरी-चिंचवड विचार विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले.
विद्यमान भाजप सरकारवर कडाडून टीका करताना कॅप्टन डावर म्हणाले की, हे सरकार प्रचारतंत्र आणि ऐतिहासिक तथ्यांच्या विपर्यासावर अवलंबून आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झालेली राष्ट्रउभारणी यांची माहिती देशभरातील नागरिकांपर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. काँग्रेसच्या ऐतिहासिक वारशाविषयी जनजागृती करण्यासाठी कॅप्टन डावर देशभर दौरे करत आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राजकीय वारशाचा उल्लेख करताना कॅप्टन डावर यांनी उजव्या विचारधारेच्या महापुरुषांचे अपहरण करण्याच्या वृत्तीवर टीका केली. सरदार पटेल हे काँग्रेसचे नेते होते आणि त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती, हे त्यांनी नमूद केले. भारताच्या मूलभूत, धर्मनिरपेक्ष स्वरूपाचे महत्त्व सांगताना त्यांनी धर्म आणि जातीच्या आधारे होणाऱ्या राजकारणावर कठोर टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देताना डावर यांनी संवैधानिक संस्था आणि त्यांच्या स्वायत्ततेचा मुद्दा उपस्थित केला. आंबेडकरांच्या नावाचा राजकीय वापर केला जात असताना त्यांच्या संवैधानिक विचारांचे पालन होणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.