पुणे : सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असलेल्या एका रील आणि ऑडिओ क्लिपमध्ये पुणे शहरात गेल्या २२ तासांत तब्बल १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्याची पुणे पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत चौकशी केली असून, हा दावा निराधार आणि तथ्यहीन असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रील व ऑडिओ क्लिपची पडताळणी करण्यासाठी संबंधित पोलीस ठाणे, गुन्हे शाखा तसेच उपलब्ध इतर माध्यमांतून सखोल चौकशी करण्यात आली. यावेळी संबंधित ऑडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून माहिती घेण्यात आली. तसेच संबंधित सोसायटीचे पदाधिकारी, व्यवस्थापन, शेजारी आणि इतर व्यक्तींकडूनही वस्तुस्थिती जाणून घेण्यात आली.
या चौकशीदरम्यान पुणे शहरात गेल्या २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचे सिद्ध करणारी कोणतीही ठोस माहिती, नोंद किंवा पुरावा पोलिसांच्या निदर्शनास आलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेली रील आणि ऑडिओ क्लिप ही तथ्यहीन व निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, या प्रकरणाची सविस्तर चौकशी अद्याप सुरू असून, तपासादरम्यान नवीन माहिती किंवा पुरावा समोर आल्यास त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर कोणतीही माहिती प्राप्त झाल्यास तिची खातरजमा न करता ती पुढे प्रसारित करू नये. अशा अप्रमाणित माहितीमुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीती, संभ्रम आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये.पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही वास्तविक घटना, संशयास्पद बाब किंवा संबंधित माहिती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.