सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिवेआगरची सहल ठरली आयुष्यभराची काळी आठवण; आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह आळंदीत दाखल, पालकांचा आक्रोश
 शहर

‘आम्ही प्रयोगशाळेतले उंदीर नाही’; एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीतील बदलांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश

डिजिटल पुणे    03-10-2026 17:21:27

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पद्धतीत वारंवार बदल होण्याच्या शक्यतेमुळे परीक्षार्थींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्णनात्मक पद्धतीऐवजी पुन्हा वस्तुनिष्ठ पद्धत लागू करण्याच्या चर्चेला विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, पुण्यातील टिळक चौकात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. परीक्षा पद्धतीबाबत सरकारने सातत्य ठेवावे आणि कोणताही निर्णय तज्ज्ञांच्या शिफारशींच्या आधारे घ्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून अनेक विद्यार्थी वर्णनात्मक पद्धतीनुसार परीक्षेची तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत अचानक परीक्षा पद्धत बदलल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने तयारी करावी लागेल. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक तसेच मानसिक ताण वाढणार असल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

‘आम्ही प्रयोगशाळेतील उंदीर नाही. आमच्यावर वारंवार परीक्षा पद्धतीचे प्रयोग करू नयेत,’ अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थी गुणवंत सावळकर यांनी व्यक्त केली. प्रशासनाला कोणत्या प्रकारचे अधिकारी अपेक्षित आहेत, त्यानुसार परीक्षा पद्धती निश्चित करणे आवश्यक आहे. वर्णनात्मक पद्धतीतील त्रुटी असतील तर त्या दूर करून ती अधिक प्रभावीपणे राबवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

परीक्षा पद्धतीतील बदल हा रस्त्यावरच्या गर्दीच्या दबावाखाली न करता तज्ज्ञांच्या अभ्यास आणि शिफारशींच्या आधारे व्हावा, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. विद्यार्थी प्रसाद दरेकर यांनी सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीचा अधिकृत अहवाल येईपर्यंत कोणताही घाईघाईचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी केली.

दरम्यान, पेपर तपासणीतील संभाव्य त्रुटींच्या मुद्द्यावरही विद्यार्थ्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. तपासणी प्रक्रियेत अडचणी असतील तर त्यासाठी पारदर्शक मानक कार्यपद्धती (SOP) लागू करावी; मात्र संपूर्ण परीक्षा पॅटर्नच बदलणे हा त्यावरील योग्य उपाय नसल्याचे विद्यार्थिनी मयूरी गाडे यांनी सांगितले. याशिवाय पूर्वीच्या वस्तुनिष्ठ पद्धतीत पेपरफुटीच्या घटना घडल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

बदलामुळे आर्थिक आणि मानसिक ताण

छत्रपती संभाजीनगर येथील परीक्षार्थी उद्धव साळुंखे यांनी परीक्षा पद्धतीतील वारंवार होणाऱ्या बदलांचा विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम अधोरेखित केला. २०२३ मध्ये वर्णनात्मक पद्धतीची घोषणा झाल्यानंतर त्यानुसार तयारी सुरू केली. त्यासाठी कुटुंबीयांनीही आर्थिक नियोजन केले. आता पुन्हा वस्तुनिष्ठ पद्धत लागू झाल्यास नव्याने तयारी करण्यासाठी आणखी काही वर्षे लागतील. त्यामुळे वेळ, पैसा आणि मानसिक स्थैर्य या तिन्हींचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

- एमपीएससीची वर्णनात्मक परीक्षा पद्धत कायम ठेवावी.

- परीक्षा पद्धतीबाबत सातत्य राखावे.

- तज्ज्ञ समितीच्या अहवालाच्या आधारेच अंतिम निर्णय घ्यावा.

- परीक्षा आणि निकालाचे वार्षिक वेळापत्रक निश्चित करून त्याची अंमलबजावणी करावी.

- उत्तरपत्रिका तपासणीसाठी पारदर्शक आणि प्रमाणित SOP लागू करावी.

- परीक्षा आयोजनातील त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

परीक्षा पद्धतीबाबत वारंवार निर्माण होणारी अनिश्चितता थांबवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून दीर्घकालीन आणि स्थिर धोरण निश्चित करावे, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती