सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिवेआगरची सहल ठरली आयुष्यभराची काळी आठवण; आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह आळंदीत दाखल, पालकांचा आक्रोश
 जिल्हा

‘जमीन विकली, पोत गहाण ठेवली; तरी कर्जाचा डोंगर कायम’ — चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने जीवन संपवलं

डिजिटल पुणे    03-10-2026 18:36:13

बुलढाणा : दुष्काळ, नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर येथे घडली. शंकर रामभाऊ भारसाकळे या अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.

जीवन संपवण्यापूर्वी भारसाकळे यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत कर्जबाजारीपणाची व्यथा मांडली आहे. ‘वावर विकलं, जमीन गहाण ठेवली, पत्नीची पोतही गहाण ठेवली; तरी कर्ज फिटलं नाही,’ अशा आशयाचा उल्लेख या चिठ्ठीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही काळापासून परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पिकांचे नुकसान आणि शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट अधिकच गंभीर झाले आहे. याच परिस्थितीत शंकर भारसाकळे यांच्यावर कर्जाचा वाढता भार होता. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी जमीन विकण्यासह इतर मौल्यवान वस्तू गहाण ठेवल्या; मात्र आर्थिक संकटातून त्यांची सुटका झाली नाही.

विशेष म्हणजे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा हा दौरा असतानाच, मंत्री गावात पोहोचण्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली.

या घटनेनंतर चोंडी टाकळेश्वर गावात हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांऐवजी तातडीने प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या घटनेमुळे दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.


 Give Feedback



 जाहिराती