सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णीमध्ये गाडी पार्किंग करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या तुंबळ हाणामारीत एका तरुणाचा चाकूने भोकसून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना टेंभूर्णी येथील नाळेवस्ती परिसरात घडली .गाडी पार्किंग करण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाने टोक गाठत एका तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे घडली. नाळेवस्ती परिसरात गुरुवारी (दि. 1) रात्री सुमारे 10.15 वाजता ही घटना घडली. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या नागनाथ मच्छिंद्र जाधव (वय 41, रा. वेणेगाव, ता. माढा) यांना आपला जीव गमवावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, नाळेवस्ती येथील सद्दाम पटवारी यांच्या घरासमोरील पार्किंगच्या जागेत वाहन लावण्यावरून सद्दाम पटवारी आणि राज कदम यांच्यात वाद सुरू झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी नागनाथ जाधव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी परिस्थिती चिघळली आणि संशयित आरोपींनी नागनाथ यांना शिवीगाळ करत खाली पाडले. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
दरम्यान, वाद अधिकच वाढल्यानंतर समाधान चौधरी आणि सागर कुटे यांनी सोबत आणलेल्या चाकूने नागनाथ जाधव यांच्या पाठीवर आणि मांडीवर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी प्रथम टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकलूज येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच शुक्रवारी (दि. 2) पहाटे त्यांचा मृत्यू झाला.या घटनेत सद्दाम पटवारी हेदेखील जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर संशयित आरोपी वाहनातून घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे.
सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी मृत नागनाथ जाधव यांचे भाऊ महेश मच्छिंद्र जाधव (वय 39) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून राज कदम, समाधान चौधरी, रणजीत पवार (तिघे रा. टेंभुर्णी), सागर कुटे (रा. वेणेगाव) आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर यांनी प्राथमिक कार्यवाही केली असून, करमाळा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
नागनाथ जाधव हे पिकअप वाहन चालक म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. केवळ भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या नागनाथ यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता वेणेगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.