पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन त्यांच्याशी थेट संवाद साधावा, अशी भूमिका पवार यांनी मांडली.पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह मुंबई आणि राज्यातील विविध भागांत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद उमटत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘‘आंदोलनात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांसोबतच इतर अनेक विद्यार्थीही सध्या अस्वस्थ आहेत. काही विद्यार्थ्यांनी माझी भेट घेऊन त्यांच्या समस्या आणि भूमिका मांडली आहे. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेता सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद होणे आवश्यक आहे,’’ असे पवार म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचेही पवार यांनी सांगितले. मात्र, मुख्यमंत्री सध्या मुंबईबाहेर असल्याने त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा होऊ शकली नाही. मुख्यमंत्री मुंबईत परतल्यानंतर त्यांनी या प्रश्नात लक्ष घालून विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशी विनंती आपण केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय घेणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे सांगत पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि त्यांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघेल, यासाठी सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
दरम्यान, मुंबईतील ‘एसआयआर’च्या मुद्द्यावरून निघालेल्या मोर्चाबाबतही पवार यांनी भाष्य केले. या प्रकरणात विविध राजकीय नेते आणि संघटना पुढे येत असून, चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांविरोधात योग्य निर्णय घेण्यासाठी आपण सहकार्य करू, असे त्यांनी स्पष्ट केले.