सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
  • आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदे गटाने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!
  • ‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
  • विद्यार्थी पुणे बंद करतील, मुंबईत मंत्रालयावर धडकतील; 2 दिवसांचा अल्टीमेटम देतोय, रोहित पवार आक्रमक
 जिल्हा

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री जयकुमार गोरे

डिजिटल पुणे    05-10-2026 12:06:24

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू आहे. पंचनाम्यांचे अहवाल शासनास सादर झाल्यानंतर शासनाच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन व प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

दुष्काळी परिस्थिती तसेच पाणीटंचाईच्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढा तालुक्यातील तुळशी येथील शेतकरी व ग्रामस्थ यांची भेट घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, रणजीत शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, माढा उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले यांच्यासह दुष्काळ निवारणाशी संबंधित विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शंभर टक्के नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यांपासून वंचित राहणार नाही, तसेच पंचनामे न झाल्यामुळे कोणताही पात्र शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

पंचनाम्यांची कार्यवाही अचूक व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करण्यात येतील. त्यानंतर शासनाच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.

तुळशी गावातील शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत चारा डेपो सुरू करण्याबाबतचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच तुळशी गावातील शेतकऱ्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. गावात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी योग्य नियोजन करून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसानीचे पंचनामे वेळेत व अचूकपणे पूर्ण करणे आणि पाणी व चारा उपलब्धतेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करणे याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी यावेळी सांगितले.यावेळी शेतकऱ्यांनी पीक नुकसान, पाणीटंचाई, जनावरांसाठी चारा उपलब्धता तसेच चारा डेपो सुरू करण्याबाबतच्या मागण्या व अडचणी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.


 Give Feedback



 जाहिराती