पुणे : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्रामीण जनतेला आवश्यक मदत व सवलती तातडीने देण्यात याव्यात, तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात वाढ करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, पुणे शहरच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, पुणे शहर (पश्चिम) विशाल विलास तांबे , अंकुश काकडे, शहर-अध्यक्ष (पूर्व) श्रीकांत पाटील, प्रदेश-अध्यक्ष युवती मनाली भिलारे, स्वाती पोकळे, कमल ढोले- पाटील, रवी वर्पे, देवदत्त निकम, महादेव कोंढरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर, दूध उत्पादक व ग्रामीण जनतेसमोर गंभीर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. खा. शरदचंद्र पवार यांनी दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन दुष्काळग्रस्तांना आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना व सवलती देण्याची मागणी केली आहे. त्याअनुषंगाने पुणे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासनाच्या सर्व संबंधित सवलती व मदत तातडीने मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच सध्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दूध उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून पशुखाद्य, चारा, औषधे, मजुरी व पशुपालनाचा इतर खर्च सातत्याने वाढत असल्याने सध्याचा दूध दर अपुरा ठरत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दूध खरेदीच्या दरामध्ये योग्य प्रमाणात तातडीने वाढ करण्यात यावी, तसेच शासनाच्या माध्यमातून आवश्यक आर्थिक व इतर सहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील दुष्काळाची प्रत्यक्ष परिस्थिती, पाणीटंचाई, पिकांचे नुकसान, जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता, रोजगाराचा प्रश्न आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट यांचा प्रशासनाने तातडीने आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देऊन दुष्काळग्रस्त व दूध उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली.