सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
  • मिसिंग लिंकवर पहाटे अपघातांची मालिका; आधी केळीचा पिकअप टेम्पो पलटी, त्यानंतर बस-ट्रकची धडक, ६ ते ७ प्रवासी जखमी
 क्राईम

पुणे हादरलं ! संपत्तीच्या वादातून नातवावर गोळीबार; ८३ वर्षीय आजोबांना अटक, अपघाताचा बनाव उघडकीस

डिजिटल पुणे    06-10-2026 16:36:00

लोणावळा : पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात संपत्तीच्या वादातून ३३ वर्षीय नातवाची गोळी झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ८३ वर्षीय आजोबा मोतीराम मराठे यांना अटक केली आहे. सुरुवातीला रायफल साफ करताना अचानक गोळी सुटल्याने अभय यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून गोळीबाराचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले.

मृत तरुणाचे नाव अभय माणिक मराठे (३३) असे आहे. अभय हे लोणावळा शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक माणिक मराठे यांचे पुत्र होते. ५ ऑक्टोबर रोजी भुशी गावातील हॉटेल मोतीरामच्या आवारात ही घटना घडली.

घटनेनंतर अभय यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला अभय हे आजोबांची रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटल्याने जखमी झाल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूच्या दिशेने तपास सुरू केला.

मात्र शवविच्छेदन अहवाल आणि घटनास्थळावरील परिस्थितीचा तपास करताना पोलिसांना या घटनेबाबत संशय आला. जखमेचे स्वरूप तसेच घटनास्थळावरील परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी गोळीबाराच्या शक्यतेने तपास पुढे नेला.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसह लोणावळा शहर पोलिसांनी हॉटेलमधील कर्मचारी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली. या चौकशीत अभय आणि त्यांचे आजोबा मोतीराम मराठे यांच्यात संपत्ती तसेच एका व्यवहारावरून वाद असल्याची माहिती समोर आली.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी अभय आणि मोतीराम यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर मोतीराम मराठे यांनी त्यांच्या परवानाधारक रायफलमधून अभय यांच्या दिशेने गोळी झाडल्याचा आरोप आहे. गोळी लागून गंभीर जखमी झालेल्या अभय यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी मोतीराम मराठे यांना अटक केली आहे. तसेच घटना अपघात असल्याचे भासवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून कुटुंबातील अन्य पाच जणांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती