वडगाव मावळ/तळेगाव दाभाडे: मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल 'हरामी 'असा शब्द वापरल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी भाजपा मावळ तालुक्याच्या वतीने उद्या गुरुवार दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडे दहा वाजता वडगाव मावळ येथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.हा निषेध मोर्चा पोटोबा महाराज मंदिर, वडगाव मावळ येथून निघणार आहे. या मोर्चामध्ये भाजपा मावळ तालुक्यातील सर्व मंडलांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी आणि संघटनेचा स्वाभिमान जपण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले. भाजप हा केवळ पक्ष नाही तर निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभे असलेले संघटन आहे. कार्यकर्त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही आणि लोकशाही मार्गाने निषेध नोंदवला जाईल, अशी भूमिका भाजपा मावळ तालुक्याने घेतली आहे.
कार्यकर्ते , पदाधिकारी आणि जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा पवन मावळ मंडलाचे अध्यक्ष दत्तात्रय जानोबा माळी, लोणावळा-नाणे मावळ मंडलाचे अध्यक्ष अनिल दगडूआबा गायकवाड, देहू-देहूरोड मंडलाचे अध्यक्ष रघुवीर उद्धवराव शेलार, वडगाव-कामशेत मंडलाचे अध्यक्ष अभिमन्यू प्रकाश शिंदे आणि तळेगाव दाभाडे-इंदोरी मंडलाचे अध्यक्ष विनायक गंगाराम भेगडे यांनी केले आहे.