पुणे : सध्या मोबाइल आणि समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरासोबत ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, ओटीपी शेअर करणे, लाइव्ह लोकेशन टाकणे तसेच अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन मैत्री करणे टाळावे. समाजमाध्यमांवर कोणतीही माहिती किंवा छायाचित्रे शेअर करण्यापूर्वी दोनदा विचार करावा. डिजिटल माध्यमांचा वापर जबाबदारीने करणे आवश्यक आहे. बदलाची सुरुवात स्वतःपासून करा, असे आवाहन नऱ्हे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी केले.
महात्मा गांधी जयंती आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नऱ्हे येथील ओएसिस कॉलेज ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशमुख बोलत होत्या.

यावेळी नऱ्हे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, पोलीस हवालदार उर्मिला काकडे, महाविद्यालयाच्या प्राचार्या अश्विनी दौलत बाफना, संयोजक विजया गुजराथी, आस्ता जूनगडे, प्रीती भाटकर, श्रुती बजाज आणि शुभांगी जवळगेकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या जीवनकार्याचा तसेच सत्य, अहिंसा, साधेपणा आणि देशसेवेच्या विचारांचा गौरव करण्यात आला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या अश्विनी दौलत बाफना म्हणाल्या, “महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचा संदेश संपूर्ण जगाला दिला. आजच्या डिजिटल युगातही गांधीजींचे विचार तितकेच महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून सत्य, शिस्त, अहिंसा आणि सामाजिक जबाबदारी जपली पाहिजे. गांधीजींच्या विचारांतून प्रेरणा घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे.”
