सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत राडा सुरूच, राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक, तिसऱ्या दिवशीही पोलिसांचा तगडा बंदोबस्त
  • : नाना पाटेकरांवर पुण्यातील डोणजे गावात आजच अंत्यसंस्कार, लाडक्या नटसम्राटाला शासकीय इतमामात निरोप!
  • नाना पाटेकरांचा निधनाच्या ४८ तास आधीचा VIDEO व्हायरल; मुलांसोबत रमले, तबला वाजवला अन् कुणालाही कल्पना नव्हती...
  • ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधन; मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा
 विश्लेषण

खांद्यावर ट्रॅक्टरचे सुटे भाग अन् मनात शिवरायांची स्मृती! जिद्दी शेतकऱ्यांनी रायरेश्वरावर घडवली ‘हरित क्रांती’

डिजिटल पुणे    08-10-2026 10:42:16

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४५ मध्ये मावळ्यांसोबत ज्या रायरेश्वराच्या डोंगरावर स्वराज्याची शपथ घेतली, त्याच भूमीत आज शेतकरी आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शेतीची नवी कहाणी लिहित आहेत. डोंगराळ आणि दुर्गम भागातील खडतर परिस्थितीवर मात करत रायरेश्वरच्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली असून, ट्रॅक्टरच्या मदतीने शेतीची मशागत करण्याचा मार्ग शोधला आहे.

रायरेश्वर परिसरातील शेती करणे हे सोपे काम नाही. सुमारे १८ किलोमीटर परिसरात पसरलेल्या पठारावर पूर्वी केवळ बैलांच्या सहाय्याने शेती केली जात होती. त्यामुळे मशागतीसाठी मोठा वेळ आणि श्रम लागत होते. मात्र, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत ट्रॅक्टर शेतापर्यंत नेण्याचा धाडसी निर्णय घेतला.

ट्रॅक्टर नेण्यासाठी अनोखी कसरत

रायरेश्वरच्या डोंगरावर ट्रॅक्टर नेण्यासाठी मोठे आव्हान होते. अरुंद वाटा, चढ-उतार आणि खडतर रस्त्यांमुळे संपूर्ण ट्रॅक्टर वर नेणे शक्य नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचे सुटे भाग वेगवेगळे करून ते खांद्यावरून डोंगरावर नेण्याचा मार्ग स्वीकारला.

पायवाटेने ट्रॅक्टरचे भाग नेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी पायऱ्या चढत, तर काही ठिकाणी अवघड वाटांमधून हे भाग डोंगरावर पोहोचवले जातात. त्यानंतर स्थानिक मेकॅनिकच्या मदतीने डोंगरावरच ट्रॅक्टर पुन्हा जोडला जातो. अशा पद्धतीने तयार केलेला ट्रॅक्टर शेतात मशागतीसाठी वापरला जातो.

३० ग्रामस्थांनी खांद्यावर नेले ट्रॅक्टरचे भाग

सुमारे तीन वर्षांपूर्वी अशोक जंगम यांच्यासह २५ ते ३० ग्रामस्थांनी ट्रॅक्टरचे इंजिन, चाके, बॉडीचे सुटे भाग डोक्यावरून रायरेश्वरच्या माथ्यावर नेले. त्यानंतर मेकॅनिकला बोलावून डोंगरावरच ट्रॅक्टर जोडण्यात आला. या प्रयत्नामुळे डोंगरावरील शेतीच्या मशागतीचे काम अधिक सोपे झाले.

त्यानंतर शंकर जंगम यांनी आणखी एक मोठा ट्रॅक्टर खरेदी केला. हा ट्रॅक्टरही अशाच पद्धतीने सुटे भाग करून डोंगरावर नेण्यात आला. सध्या रायरेश्वरावर दोन ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीची मशागत केली जात आहे.

गहू, नाचणी, वरई अन् कडधान्यांचे उत्पादन

रायरेश्वरच्या पठारावर गहू, नाचणी, वरई आणि कडधान्यांची पिके घेतली जातात. ट्रॅक्टरच्या मदतीने मशागत करणे सोपे झाल्याने शेतकऱ्यांना वेळ आणि श्रमाची बचत होत आहे. चांगला पाऊस झाल्यास या डोंगरावरून मोठ्या प्रमाणात धान्य उत्पादन मिळते. या शेतीतून सातारा, पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत आहे.

रायरेश्वरावर सुमारे २०० हेक्टर क्षेत्र

स्थानिकांच्या माहितीनुसार, रायरेश्वरावर सुमारे २०० हेक्टर क्षेत्र आहे. यातील मोठा भाग वनविभागाच्या हक्काखाली असून उर्वरित क्षेत्रापैकी सुमारे ५० हेक्टर जमीन शेतीयोग्य आहे. या जमिनीवर शेतकरी विविध पिकांची लागवड करतात. डोंगराळ परिस्थितीमुळे येथे शेती करणे म्हणजे मोठे आव्हान असले तरी शेतकऱ्यांनी त्यावरही मात केली आहे.

डिझेलसाठी तब्बल ६० किलोमीटरचा फेरा

डोंगरावर ट्रॅक्टर पोहोचला असला तरी त्यासाठी लागणारे डिझेल मिळवणे हेही शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान आहे. डोंगरावरील ट्रॅक्टरला डिझेल आणण्यासाठी सुमारे ३० किलोमीटर अंतरावरील वाई शहरात जावे लागते. ये-जा मिळून हा फेरा तब्बल ६० किलोमीटरचा होतो. त्यामुळे एकावेळी २०० ते ३०० लिटर डिझेल साठवून ठेवावे लागते. मशागतीसाठी ट्रॅक्टरला लागणाऱ्या डिझेलचा खर्चही मोठा आहे.

डोंगर, अवघड वाटा, वाहतुकीची अडचण आणि वाढता खर्च अशा अनेक अडथळ्यांवर मात करत रायरेश्वरचे शेतकरी शेती करत आहेत. शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या याच भूमीत आज शेतकऱ्यांची ही जिद्द आणि आधुनिक शेतीची वाटचाल एका वेगळ्या ‘हरित क्रांती’चे दर्शन घडवत आहे.


 Give Feedback



 जाहिराती