पुणे : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आपल्या दमदार अभिनयासोबतच परखड आणि बेधडक स्वभावासाठी ओळखले जाणारे नाना पाटेकर यांनी वयाच्या 75व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या मुलाखती आणि वक्तव्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यातील एका जुन्या व्हिडीओने सध्या अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे.
नाना पाटेकर मृत्यूबद्दलही तितक्याच स्पष्टपणे आणि कोणताही आडपडदा न ठेवता बोलायचे. मृत्यूची भीती वाटत नसल्याचं ते अनेकदा आपल्या खास शैलीत सांगायचे. विशेष म्हणजे, स्वतःच्या अंत्यविधीची तयारीही त्यांनी आयुष्यातच करून ठेवली होती, अशी माहिती आता समोर आली आहे.
नानांची शेवटची इच्छा काय होती?
पाणी फाऊंडेशनचे सीईओ गणेश थोरात यांनी नाना पाटेकर यांच्या अंत्यविधीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. नानांनी आपले अंत्यसंस्कार त्यांच्या स्वतःच्या शेतातच करण्यात यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती.गणेश थोरात यांच्या म्हणण्यानुसार, नाना म्हणायचे, “माझं काहीही झालं तरी माझे अंत्यविधी माझ्या शेतात करा. मला त्या मातीत राहू द्या, मला त्याच मातीत मिसळा.”
एवढंच नाही, तर आपल्या शेतात वाढलेल्या झाडांपासून मिळणाऱ्या लाकडांचाच आपल्या अंत्यविधीसाठी वापर करावा, अशीही नानांची इच्छा होती. त्यांनी अंत्यविधीसाठी लागणारी लाकडं आधीच बाजूला काढून ठेवली होती, अशी माहितीही गणेश थोरात यांनी दिली.त्यामुळे नाना ज्या मातीत रमले, त्याच मातीत अखेरचा विसावा घ्यावा, ही त्यांची इच्छा किती खोलवर रुजलेली होती, याची प्रचिती येते.
‘12 मण लाकडं लागणार आहेत…’
दरम्यान, नाना पाटेकरांचा मृत्यूबाबत बोलतानाचा एक जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या मुलाखतीत नाना स्वतःच्या सरणासाठी लागणाऱ्या लाकडांबद्दल बोलताना दिसतात.
“मला माहिती आहे, कधी ना कधी मला जायचंय. त्यासाठी 12 मण लाकडं लागणार आहेत. तेवढीच लागणार आहेत. हीच माझी शेवटची संपत्ती…” अशा शब्दांत नाना मृत्यूबद्दल बोलताना दिसतात.आपल्या सरणासाठीची लाकडं जमा करून ठेवली असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. ही लाकडं सुकलेली असावीत, ओली लाकडं वापरू नयेत, असंही नाना आपल्या खास मिश्कील शैलीत सांगतात.त्यांच्या या वक्तव्यात मृत्यूबद्दलची त्यांची निर्भयता तर दिसतेच; पण त्यासोबतच स्वतःच्या मृत्यूलाही विनोदाच्या माध्यमातून स्वीकारण्याची त्यांची वेगळी वृत्तीही जाणवते.
‘माझ्यासाठी रडतायत’ याचा गैरसमज नको!
या व्हिडीओतील नानांचं आणखी एक वाक्य मन हेलावून टाकणारं आहे. अंत्यसंस्कारावेळी आजूबाजूचे लोक जमतील आणि धुरामुळे त्यांच्या डोळ्यांत पाणी येईल, त्याचा गैरसमज होऊ नये, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली होती.“माझ्या मृत्यूनंतर गैरसमज होईल की हे सगळे माझ्यासाठीच रडतायत… कमीत कमी मी मेल्यानंतर तरी गैरसमज नकोत,” अशा आशयाचं नानांचं वक्तव्य होतं.नानांचा हा व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल होत असून, त्यांच्या चाहत्यांसाठी हे शब्द अक्षरशः काळजाला भिडणारे ठरत आहेत.
निधनाची बातमी आणि चाहत्यांना धक्का
नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अचानक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली. मध्यरात्री छातीत त्रास जाणवल्यानंतर त्यांनी मित्राला संदेश केल्याचेही सांगितले जात आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने अखेर नानांना गमवावे लागले.
नाना पाटेकर म्हणजे अभिनयाची एक स्वतंत्र शाळा होती. समांतर सिनेमा असो, गंभीर भूमिका असो किंवा विनोदी व्यक्तिरेखा—प्रत्येक भूमिकेला त्यांनी आपल्या अभिनयाने वेगळी उंची दिली. पडद्यावरच्या भूमिकांइतकाच त्यांचा खरा स्वभावही चाहत्यांना भावला.आज त्यांच्या जाण्याने अभिनयविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मृत्यूकडेही निर्भयपणे पाहणारा आणि आयुष्यभर आपल्या शब्दांनी, अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने लाखो लोकांच्या मनावर ठसा उमटवणारा हा अवलिया कलाकार कायमचा स्मरणात राहणार आहे.