पुणे : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांच्या निधनावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. “नाना, तुमचा असा अचानक निरोप मनाला चटका लावून गेला,” अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला सुन्न करून गेली. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे समोर आले. नाना पाटेकर हे आपले अत्यंत जवळचे स्नेही होते, अशी भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर पुण्यातील नाना पाटेकर यांच्या घरी झालेल्या भेटीच्या आठवणीही चंद्रकांत पाटील यांनी जागवल्या. त्या भेटीत झालेला आपुलकीचा संवाद, मनमोकळ्या गप्पा आणि नानांची ऊर्जा आजही डोळ्यांसमोर असल्याचे त्यांनी सांगितले. “ही आपली शेवटची भेट ठरेल, असे कोणाला वाटलेही नसेल,” असे म्हणत त्यांनी नानांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
मराठी रंगभूमीपासून हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीपर्यंत नाना पाटेकर यांनी आपल्या अफाट अभिनयाने, खणखणीत संवादफेकीने आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘अग्निसाक्षी’ आणि ‘खामोशी’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्री यांसारख्या प्रतिष्ठेच्या सन्मानांनी त्यांच्या कलाप्रतिभेचा गौरव करण्यात आला. अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही नाना पाटेकर यांचे मोठे योगदान होते. ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी आणि गरजूंसाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय राहिले.
नाना पाटेकर यांच्या स्पष्टवक्त्या आणि कणखर स्वभावामागे अत्यंत हळवे, संवेदनशील आणि माणसांवर मनापासून प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व होते, असे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले. सामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी ओळख होती.
“आज मी केवळ एक महान कलावंत गमावला नाही, तर माझ्या मनाच्या जवळचा एक आपुलकीचा सोबती गमावला आहे. नानांचे जाणे ही भारतीय कलाक्षेत्राची, समाजकारणाची आणि आपल्या सर्वांचीच कधीही भरून न निघणारी हानी आहे,” अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“नाना, तुम्ही साकारलेल्या अजरामर भूमिका आणि तुमच्या आठवणी मनात सदैव जिवंत राहतील. कलासृष्टीच्या या खऱ्या ‘नटसम्राटाला’ माझी भावपूर्ण श्रद्धांजली!” असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.