पुणे : एस.एम. जोशी पुलावर आंदोलन केल्याप्रकरणी १५ आंदोलकांवर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष विशाल तांबे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. पूर्वकल्पना न देता अचानक आंदोलन केल्याचा ठपका ठेवत सरकारविरोधात चिथावणीखोर वक्तव्य, बेकायदेशीर जमाव आणि वाहतुकीला अडथळा या कलमांखाली १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना विशाल तांबे म्हणाले, "एकिकडे सरकार चर्चेचे नाटक करते आणि दुसरीकडे आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करते. हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रकार आहे. ज्या आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्याचे सांगितले जाते, त्यांच्यावरच गुन्हे दाखल करणे ही दुटप्पी भूमिका आहे.""या दडपशाहीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आंदोलकांच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी उभा राहील. हे गुन्हे तात्काळ मागे घेतले नाहीत, तर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल,"