सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी येण्याची शक्यता! राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा; विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन
  • नाना पाटेकरांच्या मृत्यूची अनैसर्गिक म्हणून नोंद; गोवा पोलिसांकडून सविस्तर तपास सुरू, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष, कुटुंबीयांचे जबाब नोंदवणार
 जिल्हा

पनवेल काँग्रेसचा एल्गार! खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    09-10-2026 18:03:42

उरण : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी केलेल्या अटकेच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देशभरात ९ ऑक्टोबर हा दिवस ‘भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस’ म्हणून पाळण्यात आला. या आंदोलनाचे तीव्र पडसाद पनवेलमध्येही उमटले. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करण्यात आले. सुरुवातीला कार्यकर्त्यांनी सुमारे एक तास शांततेत बसून केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांचा आणि लोकशाहीविरोधी कारवायांचा निषेध व्यक्त केला.

यानंतर जिल्हाध्यक्ष डॉ. श्रुती श्याम म्हात्रे यांनी आपल्या आक्रमक शैलीत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्या म्हणाल्या की, लोकशाहीची गळचेपी आणि नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणण्याचे प्रयत्न सुरू राहिल्यास काँग्रेसचे आंदोलन थांबणार नाही. हे आंदोलन केवळ एका दिवसापुरते मर्यादित नसून लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी सुरू झालेली दीर्घकालीन प्रक्रिया आहे. जोपर्यंत देशात लोकशाहीची गळचेपी होईल, तोपर्यंत काँग्रेसचा संघर्ष अविरत सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

एसआयआर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; मतदारांच्या अधिकारांसाठी काँग्रेसचा लढा

आपल्या भाषणात काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.श्रुती म्हात्रे यांनी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले. मतदार यादीतील  अनियमितता, मतचोरीचे आरोप आणि पनवेलमधील मतदारांच्या अधिकारांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निवडणूक आयोगाची उत्तरदायित्वाची भूमिका याबाबत केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.काँग्रेस नेत्यांना आंदोलनादरम्यान अडवून अटक करण्यात आल्याची घटना ही लोकशाही मूल्यांवर घाला असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला.

नगरसेवक हरिश केणी यांची भाजप सरकारवर टीका

या आंदोलनात नगरसेवक हरिश केणी यांनीही उपस्थितांना संबोधित केले. खारघर परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडे एसआयआर तपासणीसंबंधीचे फॉर्म आढळल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. तसेच पनवेलमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधले. पनवेल महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचारावरही त्यांनी जोरदार टीका करत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले.

महिलांवरील अत्याचार आणि एसआयआर प्रक्रियेवर शशिकला सिंग यांचा घणाघात

माजी नगरसेविका शशिकला सिंग यांनी भाजप सरकारवर टीका करत देशातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांचा मुद्दा उपस्थित केला. एसआयआर प्रक्रियेत जाणूनबुजून विशिष्ट समाजघटकाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदार यादीच्या पुनरीक्षणाची प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मतदानाचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न सहन करणार नाही : नगरसेवक लतीफ शेख

नगरसेवक लतीफ शेख यांनी संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारवर समाजात जात आणि धर्माच्या आधारे तेढ निर्माण केल्याचा आरोप केला. एसआयआर प्रक्रियेच्या माध्यमातून नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. लोकशाहीत प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळणे आवश्यक असून या अधिकाराच्या संरक्षणासाठी काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असे ते म्हणाले.

मतदानाचा अधिकार हा केवळ काँग्रेसचा नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचा अधिकार : अजय कापरे

आंदोलनाचे प्रास्ताविक पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अजय पांडुरंग कापरे यांनी केले. ते म्हणाले की, देशभर सुरू असलेले काँग्रेसचे आंदोलन हे केवळ एका राजकीय पक्षापुरते मर्यादित नाही. भारतीय संविधानाने प्रत्येक पात्र नागरिकाला दिलेला मतदानाचा मूलभूत अधिकार अबाधित राहावा, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण व्हावे, यासाठी हा देशव्यापी लढा सुरू आहे.लोकशाही आणि संविधानाचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून येणाऱ्या काळात काँग्रेसच्या वतीने विविध मार्गांनी आयोजित करण्यात येणाऱ्या आंदोलनांमध्ये नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अजय कापरे यांनी केले.

या आंदोलनात पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे विविध ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस, ओबीसी सेल, मागासवर्गीय सेल, काँग्रेस सेवादल, एनएसयूआय तसेच काँग्रेसचे विविध विभागांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.त्याचप्रमाणे नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात समर्थन नोंदवत येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस सोबत रस्त्यावर उतरू अशा पद्धतीतला विश्वास व्यक्त केला.डॉ.श्रुती म्हात्रे यांच्या माध्यमातून पनवेल काँग्रेस ही आक्रमक पद्धतीमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये भाजपवर हल्लाबोल करील यात काही शंका नाही... काँग्रेसच्या माध्यमातून देशाला ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेता लाभलेला आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये रायगड मधील सरकार विरोधातील बुलंद आवाज काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ .श्रुती म्हात्रे च्या माध्यमातून भाजपवर हल्लाबोल केल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही, संविधान आणि मतदानाचा अधिकार यांच्या रक्षणासाठी काँग्रेसचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष डॉ.श्रुती म्हात्रे यांनी कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या उपस्थितीत व्यक्त केला.

आंदोलनादरम्यान डॉ.श्रुतीताई म्हात्रे जिल्हाध्यक्षा यांच्या समवेत हरेश केणी नगरसेवक, शशिकला सिंग मा. नगरसेविका, लतीफ शेख नगरसेवक,,लॉक अध्यक्ष बबन केणी,चेतन म्हात्रे,शैलेश पाटणे,विलास म्हात्रे, प्रदीप सुनके जिल्हा पदाधिकारी विजय केणी, अजय कापरे, लतीफ नालखंडे,जयंत देशमुख, कुंडलिक नेटके, सागर पगारे, जयंत देशमुख, अभिजित मुंडकल ,राकेश चव्हाण, विशाल गोगावले, अमर आंबोरे, स्वप्नील पवार, दीपक गुंजाळ, राजीव माळी, अमीना खान,माहेनूर खान, अरविंद सोनटक्के,एकनाथ ठोंबरे, जोस जेम्स, थॉमस आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते.


 Give Feedback



 जाहिराती