सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का?
  • दिल्ली पोलिसांनी पकडताच अभिजीत दिपकेंनी लपवलेला पत्ता बाहेर काढला, म्हणाले, आमच्यानंतर अजिंक्य शिंदे आंदोलनाचं नेतृत्व करेल, त्याचं ऐका!
  • अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
  • अभिजीत दिपकेंचं विमान दिल्लीत लँड झालं, पण दिल्ली पोलीस डायरेक्ट विमानात घुसले अन्... दिपके पोलिसांच्या ताब्यात
 शहर

नव्या कोऱ्या इनोव्हाभोवती गोल-गोल फिरवून जीवघेणे स्टंट! रिलस्टारसह सात जणांवर गुन्हा; आळंदी पोलिसांकडून कार जप्त

डिजिटल पुणे    10-10-2026 12:36:57

आळंदी : नवीन गाडी खरेदी केल्यानंतर तिच्या आगमनाचा जल्लोष करण्यासाठी रस्त्यावरच धोकादायक स्टंटबाजी केल्याचा प्रकार आळंदीजवळील केळगाव येथे समोर आला आहे. नव्या इनोव्हा क्रिस्टा कारला गोल-गोल फिरवत, वाहनाचा वेग अचानक कमी-जास्त करत रील तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे वाहनचालकांसह परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने आळंदी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी आळंदीतील महेश बाळकृष्ण मडके आणि बारामतीचा रिलस्टार प्रतीक शिंदे यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित इनोव्हा क्रिस्टा कार पोलिसांनी जप्त केली आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश मडके याने ७ ऑक्टोबर २०२६ रोजी इनोव्हा क्रिस्टा (एमएच १४ एनएस ४५०१) ही नवीन कार खरेदी केली होती. या गाडीच्या आगमनाचा व्हिडिओ आणि सोशल मीडियासाठी रील तयार करण्याच्या उद्देशाने मडके आणि त्याच्या साथीदारांनी केळगाव परिसरात स्टंटबाजी केल्याचा आरोप आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

नवीन गाडीच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र आलेल्या संबंधितांनी चारचाकी वाहने बेदरकारपणे चालवली. गाड्या गोल-गोल फिरवणे, अचानक वेग कमी-जास्त करणे आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे असे प्रकार करण्यात आल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे. सोशल मीडियावर रील तयार करण्याच्या नादात स्वतःच्या तसेच घटनास्थळी जमलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

ड्रोन चित्रीकरणासाठी परवानगी घेतली होती का?

या घटनेत केवळ रस्त्यावर स्टंटबाजी केल्याचाच नव्हे, तर आवश्यक परवानगी न घेता ड्रोनच्या साहाय्याने चित्रीकरण केल्याचाही मुद्दा समोर आला आहे. पिंपरी-चिंचवडचे सहपोलीस आयुक्त यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि ड्रोन वापरासंदर्भातील आदेशभंग या बाबीही पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आहेत.

रिलस्टार प्रतीक शिंदेसह सात जणांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी पोलीस शिपाई नारायण धनाजी सुरवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश बाळकृष्ण मडके, बारामती येथील रिलस्टार प्रतीक शिंदे, विशाल सातारे, यश मुंगसे आणि अन्य तीन अनोळखी व्यक्तींचा आरोपींमध्ये समावेश आहे. स्टंटबाजीसाठी मदत केल्याचा आरोप असलेल्या इतर वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी इनोव्हा क्रिस्टा कार जप्त केली असून, या घटनेत वापरण्यात आलेल्या इतर वाहनांबाबतही कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या नादात धोकादायक प्रकार

महेश मडके हा सोशल मीडियावरील रील्समुळे चर्चेत आल्याचे सांगितले जाते. नवीन गाडीच्या खरेदीचा जल्लोष साजरा करताना घोडे आणि ट्रेलरचाही वापर केल्याचे संबंधित व्हिडिओंमध्ये दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या सेलिब्रेशनदरम्यान करण्यात आलेल्या कथित स्टंटबाजीमुळे आता त्याच्यासह इतरांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओला अधिकाधिक प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रयत्नात सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक प्रकार करणे इतरांच्या जीवितासाठीही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा प्रकारांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट होत आहे.दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करत असून, स्टंटबाजीसाठी वापरण्यात आलेली वाहने, ड्रोन चित्रीकरण आणि संबंधित आरोपींच्या भूमिकेबाबत अधिक तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती