बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजयाचे खाते उघडले आहे. सोसायटी गटातून संग्राम तानाजी सोरटे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार महेश राणे यांचा ५७ मतांनी पराभव केला. या विजयामुळे पवार समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
सोमवारी (१२ ऑक्टोबर) सकाळी नऊ वाजता माळेगाव येथे मतमोजणीला सुरुवात झाली. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ८४.२५ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मतमोजणी सुरू होण्यापूर्वीपासूनच उमेदवारांसह कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कारखान्याच्या सत्तेवर कोणाचे वर्चस्व राहणार, याकडे संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पहिल्याच निकालात संग्राम सोरटे यांचा विजय
मतमोजणीदरम्यान जाहीर झालेल्या सोसायटी गटाच्या पहिल्या निकालात श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलचे उमेदवार संग्राम तानाजी सोरटे यांनी बाजी मारली. त्यांनी लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनलचे उमेदवार महेश महादेव राणे यांना पराभूत केले. सोरटे यांच्या विजयाने सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला सुरुवातीलाच यश मिळाले आहे.
या गटात एकूण १३० मतदार होते. त्यापैकी संग्राम सोरटे यांना ९३ मते मिळाली, तर महेश राणे यांना ३६ मते मिळाली. अपक्ष उमेदवार प्रकाश किसनराव जगताप यांना एक मत मिळाले. अशा प्रकारे सोरटे यांनी ५७ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
सोमेश्वरच्या निवडणुकीत तिरंगी लढत
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची मानली जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने निवडणूक लढवली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या मदतीने स्वतंत्र पॅनल उभे केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनलही निवडणुकीच्या रिंगणात आहे.
तीन पॅनलमध्ये झालेल्या या लढतीमुळे प्रत्येक जागेचा निकाल महत्त्वाचा ठरत आहे. सुनेत्रा पवार यांनी कारखान्याच्या सर्व २१ जागांवर विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे पहिल्या निकालातील यशानंतर उर्वरित जागांवर कोण बाजी मारणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
विजय अजितदादांना समर्पित; सभासदांच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार
विजयानंतर संग्राम सोरटे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून मतदान करणाऱ्या सर्व सभासदांचे आभार मानले. मिळालेला विजय दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या चरणी समर्पित करत त्यांना अभिवादन करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विजयाची ही घोडदौड पुढेही सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, खासदार पार्थदादा पवार आणि जयदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी काम करत राहणार असल्याचे सोरटे यांनी सांगितले.
उर्वरित २० जागांच्या निकालाकडे लक्ष
पहिल्या निकालात विजय मिळाल्याने सुनेत्रा पवार यांच्या पॅनलच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, निवडणुकीतील अंतिम चित्र स्पष्ट होण्यासाठी अद्याप २० जागांचे निकाल जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे उर्वरित मतमोजणीत कोणत्या पॅनलला किती जागा मिळतात आणि सुनेत्रा पवार यांचे सर्व जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट पूर्ण होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल आगामी काळातील स्थानिक राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे.