लातूर : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. या पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी काळजीपूर्वक सूक्ष्म नियोजन करावे, तसेच पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन ५ ऑक्टोबर रोजी शासनाने दिलेल्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा लातूरच्या पालक सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ व पीक नुकसानीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता रूपाली ठोंबरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव, पशुसंवर्धन उपायुक्त राजकुमार पडिले यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पिण्याचे पाणी व चाऱ्याचे नियोजन
पाणीटंचाई निवारण उपाययोजनांचा आढावा घेताना श्रीमती म्हैसकर म्हणाल्या की, पुढील सहा ते आठ महिने सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. जलसंपदा विभागाने महानगरपालिका व नगरपरिषदांच्या सहकार्याने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, तर ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेने आवश्यक ती कार्यवाही करावी. प्रकल्पनिहाय पाणी आरक्षणानुसार पुढील ऑगस्ट महिन्यापर्यंतचे नियोजन करावे. ज्या ठिकाणी ऑगस्टपर्यंत पाणी पुरण्याची शक्यता नाही, तेथे पर्यायी जलस्रोतांचा शोध घेऊन तातडीने आराखडा तयार करावा, असे त्यांनी सांगितले. लातूर शहरासह सर्व नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामीण भागातील शासकीय विहिरी, कूपनलिका (बोअरवेल) व हातपंपांची त्वरित दुरुस्ती करावी. तसेच ग्रामीण भागात सक्षम पर्यायी जलस्रोत शोधावेत. जल जीवन मिशनच्या अंतिम टप्प्यातील योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अत्यंत वेगाने सुरू असून त्याद्वारे पीक नुकसानीची अचूक नोंद घेतली जावी; तसेच पीक कापणी प्रयोगांची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण केली जावी. येत्या काळात पशुधनासाठी चारा हा अत्यंत महत्त्वाचा विषय ठरणार असल्याने पशुसंवर्धन विभागाने पुरेसा चारा उपलब्ध राहील यादृष्टीने चोख नियोजन करावे. ज्या शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता आहे, त्यांना चारा लागवडीसाठी प्रोत्साहित करून जिल्ह्यातील चाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना श्रीमती म्हैसकर यांनी दिल्या.
रोजगारनिर्मिती आणि जलसंधारणाच्या कामांवर भर
‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी’ (व्हीबी-जी राम जी) योजनेतून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे. स्थानिक स्तरावर गरजूंना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामांना मंजुरी देऊन ती शेल्फवर ठेवावीत. मागणीनुसार ही कामे सुरु करण्याची कार्यवाही करावी. यासोबतच, अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्याच्या सूचना पालक सचिव श्रीमती म्हैसकर यांनी दिल्या.
बैठकीत माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सांगितले की, जिल्ह्यात केवळ ५१.४ टक्के पाऊस झाल्याने सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले असून भूजल पातळी सुमारे ४.५८ मीटरने खाली गेली आहे. सध्या टंचाईग्रस्त गावांमध्ये २२० बोअरवेल्स व विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच जिल्ह्यात सध्या १०० दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध असून पुढील काळातील चारा पुरवठ्याचे नियोजन केले जात आहे. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी लातूर शहरातील पाणीपुरवठा नियोजनाची माहिती सादर केली.
या बैठकीत लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी माहिती दिली की, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलीस दलाकडून ‘पोलीस आपल्या गावात’ हा उपक्रम राबवला जात आहे. त्याद्वारे शेतीची साधने व पशुधनाची सुरक्षा, तसेच ‘ग्रामसुरक्षा दल’ स्थापन करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘वॉर रूम’च्या कामकाजाची पाहणी
दुष्काळ निवारण कामकाजाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि समन्वयासाठी जिल्हास्तरावर ‘दुष्काळ निवारण कक्ष’ (वॉर रूम) स्थापन करण्यात आला आहे. महसूल, लातूर शहर महानगरपालिका, कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम आणि नगरपरिषद विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या वॉर रूमच्या १४ सदस्यीय पथकात समावेश आहे. या वॉर रूमला पालक सचिव मनीषा म्हैसकर यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला व आवश्यक सूचना दिल्या.
पेठ शिवारात खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी
अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालक सचिव मनीषा म्हैसकर यांनी पेठ शिवारात जाऊन सोयाबीन व तूर पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चाराटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे तातडीने पावले उचलली जात असून चोख नियोजन केले जात आहे. राज्य शासनाने लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला असून लवकरच शेतकऱ्यांना थेट मदत दिली जाईल, असे श्रीमती म्हैसकर यांनी सांगितले. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली व त्यांना धीर दिला.